आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या दोषी कर्मचार्‍यांना नाममात्र दंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - महापालिकेच्या कर्मचार्‍यांवर कामातील दिरंगाई, कामाची दखल न घेणे, हलगर्जीपणा करणे आदी तक्रारी नेहमी होतात. त्यात जकात नाक्याचा विषय हा महत्त्वाचा असल्याने अधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांना त्यांच्या कामातील चुकांमुळे दंड केला. मात्र, दंडाची ही रक्कम केवळ 10 टक्के करण्याचा अजब निर्णय स्थायी समितीत घेतल्याने कर्मचार्‍यांना शिस्त लावावी किंवा नाही, असा प्रश्न निर्माण होऊन प्रशासनाच्या कारवाईला खो देण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा सभेनंतर होती.

महापालिकेच्या सभागृहात गुरुवारी स्थायी समितीची सभा घेण्यात आली. या वेळी आयुक्त दौलतखान पठाण, स्थायी समिती सभापती कल्पना महाले, उपायुक्त हनुमंत कौठळकर, सचिव मनोज वाघ आणि सदस्य उपस्थित होते. या वेळी अजेंड्यावर सात विषय होते. सातही विषयांना चर्चेअंती मंजुरी देण्यात आली. त्यात महापालिकेच्या विविध विभागातील 12 कर्मचार्‍यांना कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल दंड करण्यात आला होता. त्यात जकात विभागातील कर्मचारीही होते. कर्मचार्‍यांना एक ते पाच हजारांपर्यंत दंड करण्यात आला होता. त्यातील तीन जणांची एक वेतनवाढ रोखण्यात आली होती. कर्मचार्‍यांचा हा दंड माफ करण्यात यावा, असा विषय सभेत चर्चेला आला. त्यावर कोणतीही चर्चा न होता दंडाच्या रकमेत कपात करण्यात आली आहे. यात जे. आर. शेख यांना शंभर रुपये, नामदेव कुंभार, के. बी. बागुल यांना पाचशे रुपये, सुनील सानप, अनिल जोशी, के. डी. साबळे यांना पन्नास रुपये, योगेश गोरे, सुधाकर गोमसाळे यांना दोनशे रुपये आणि पी. जी. वळवी, संजय शिंदे, रवींद्र कुलकर्णी यांची वेतनवाढ सुरू करून त्यांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड आकारणीच्या सूचना सभापतींनी प्रशासनाला केल्या.

दंडाच्या मूळ रकमेपैकी केवळ दहा टक्के दंड आकारणी करण्यात आली. याचाच अर्थ ही कारवाई केवळ देखावा ठरली आहे. यातून कर्मचार्‍यांना दंड आकारणी करण्याच्या मुख्य उद्देशालाच खो देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महापालिकेतील रोजंदारीत वाढ करण्याचा विषय सभेपुढे आला असता या विषयाला मंजुरी देण्यात आली. त्यात कुशल कामगारांना 284, अकुशल कामगारांना 280 तर सफाई बदली कामगारांना 258 रुपये दरवाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दवाखान्याचे नूतनीकरण व प्रसूतिगृह बांधण्याचा विषय मंजूर करण्यात आला आहे.