आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा वर्ग करण्यावर मनपा प्रशासन ठाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेचे शिक्षण मंडळ बरखास्त करून मनपा शाळा जिल्हा परिषदेकडे वर्ग कराव्यात, अशा तोंडी सूचना खुद्द शिक्षण संचालकांनी चार महिन्यांपूर्वी दिल्या होत्या. तसेच आयुक्तांशी बोलणे करून द्या असेही सांगितले होते. मात्र शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकाऱ्यांनी कार्यवाही केली नाही. त्यामुळे शुक्रवारी स्थायी सभेत प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. तसेच महासभेच्या ठरावाकडे पाहायला वेळच मिळाला नसल्याचे उत्तर, प्रशासन अधिकाऱ्याने दिल्यानंतर सभागृह तापले होते. शाळा वर्ग करण्याच्या निर्णयावर मनपा प्रशासन ठाम असून यावर दोन दिवसांत कार्यवाही करण्यात यावी असे आदेश प्रशासन अधिकाऱ्याला दिले आहेत.

मनपा स्थायी समितीची सभा शुक्रवारी सकाळी ११ वाजता सभापती ज्योती चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी मनपा शाळेच्या शिक्षकांच्या आंदोलनाचा विषय गाजला. मनपाची आर्थिक परिस्थिती नसल्याने तसेच एस्कॉर्ट बंद पडल्यामुळे महासभेने शिक्षकांच्या वेतनाचे ५० टक्के पैसे देण्याचा ठराव केला होता. त्यानंतर २० मार्च रोजी मनपाच्या शाळा जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याबाबत ठरावही केला होता. परंतु, चार महिने उलटूनही शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी वसंत महाजन यांच्याकडून कोणतीही प्रक्रिया राबवली गेली नाही. त्यामुळे सर्वच सदस्यांच्या नशिाण्यावर प्रशासन अधिकारी होते.

तातडीने कार्यवाहीचे आदेश
शिक्षणमंडळाच्या शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर होत असल्याने चार महिन्यांपूर्वीच प्रशासन अधिकाऱ्यांनी शिक्षण संचालकांशी चर्चा केली होती. त्यावेळेस शिक्षण मंडळ बरखास्त करून शाळा जिल्हा परिषदेकडे वर्ग करा, तसा प्रस्ताव द्या, अशा सूचना दिल्या होत्या. परंतु, प्रशासन अधिकाऱ्यांनी काहीही केले नाही. वेळीच अंमलबजावणी केली असती तर आज आंदोलनाची वेळच आली नसती, अशी माहिती उघड झाली आहे.

शिक्षण मंडळाच्या अधिकारी फैलावर
सभापतींच्याअध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून महापालिका शाळांमध्ये अचानक पटपडताळणी करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे मोठा घोळ बाहेर निघेल, असेही मत या वेळी अमर जैन, राजू मोरे, सुनील माळी यांनी व्यक्त केले. पोषण आहाराचा पैसा मनपाचा नसला तरी केंद्राच्या योजनेचा आहे. त्यातही गैरव्यवहार असण्याची शक्यता वर्तवण्यात आली. महाजन यांनी दिवसभरात ७० पत्रव्यवहार होतात. यामुळे ठराव बघायला वेळच मिळाला नाही, असे उत्तर देताच सदस्यांनी त्यांना फैलावर घेतले.

स्वत:ला शिक्षण महर्षी समजतात का ?
ठरावक्रमांक २०६ नुसार अंमलबजावणी करण्याचा अधिकार आयुक्तांच्या पातळीवरचा आहे; तो माझा अधिकार नाही, असे उत्तर देणाऱ्या महाजन यांना नितीन लढ्ढा यांनी सुनावले. शिक्षक बदल्यांमध्ये पैसे खायचे जमते, मग मुलांच्या शिक्षणाचा विषय समजत नाही का? शिक्षकांवर वचक नाही. तसेच प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडत नाहीत. आमदार गुरुमुख जगवानींच्या पत्राला कोण हे जगवानी? असे उत्तर देतात. कोणत्या तोऱ्यात वागतात हे अधिकारी. तुम्ही स्वत:ला शिक्षण महर्षी समजतात का? असा प्रश्न लढ्ढा यांनी उपस्थित केला.
बातम्या आणखी आहेत...