आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका कर्मचारी संपात फूट पाडण्याचा उपायुक्तांचा प्रयत्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महापालिकेतील कर्मचा-यांचा वेतनासाठी सुरू असलेले कामबंद आंदोलन सुरू आहे. रविवारी सफाई युनियनने उपायुक्त अविनाश गांगोडे यांची माफी मागितल्याचे वृत्त दैनिकांमधून प्रसारित झाले. मात्र, कोणत्याही प्रकारची माफी मागितली नसल्याचा खुलासा अखिल भारतीय सफाई मजदूर संघाने पत्रक काढून केला आहे. त्यात अधिकारी संपात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही केला आहे. तसेच महापालिकेने डीआरटी न्यायालयात पगाराचे विवरणपत्र सादर केले नाही तर अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसतर्फे अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महापालिकेचे उपायुक्त गांगोडे यांनी संपाला वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न केला आहे. संघातर्फे कोणीही माफी मागितली नसताना खोट्या बातम्या त्यांनी पसरवल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरून संपात फूट पाडण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, कर्मचाऱ्यांचा दोन महिन्यांचा पगार आणि निवृत्ती वेतन घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नसून कर्मचाऱ्यांनी अशा दिशाभूल करणाऱ्या वृत्तांकडे लक्ष देता संप सुरू ठेवण्याचे आवाहन संघाच्या पत्रकात स्पष्ट केले आहे.
अवमानयाचिका दाखल करणार : चांगरे
महापालिकेच्या कर्मचा-यांचे डीआरटी न्यायालयाने सर्व बँक खात्यांना सील केले आहे. त्यामुळे दोन महिन्यांपासून पगार, निवृत्ती वेतन, भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळत नसल्याने कर्मचा-यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासंदर्भात अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसने त्रयस्त अर्जदार म्हणून डीआरटी न्यायालयात कामगारांची बाजू मांडणारी याचिका दाखल केली. त्यावर १८ सप्टेंबरला सुनावणी होऊन महापािलकेने पगारासाठी किती रक्कम द्यावी लागेल यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगाराचे विवरणपत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. या आदेशाची प्रत संघटनेने आयुक्त संजय कापडणीस यांना तत्काळ उपलब्ध करून दिली. आयुक्त कापडणीस यांनी उपायुक्त अविनाश गांगोडे यांना विवरणपत्र न्यायालयात सादर करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, १९ सप्टेंबरला महापालिकेचे वकीलच उपस्थित नव्हते. त्यामुळे महापालिकेने विवरणपत्र जर लवकरात लवकर सादर केले नाही, तर त्यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अरुण चांगरे यांनी दिला आहे.