जळगाव- उत्पनाच्या तुलनेत 60 टक्केपेक्षा अधिक आस्थापना खर्च असलेल्या जळगाव महापालिकेत दर महिन्याला वेळेवर पगाराचे वांधे आहेत. कर्जाचा भला मोठ्ठा डोंगर आणि येथील अडचणी पाहता वर्षभरापूर्वी विशेष अनुशेष भरतीच्या माध्यमातून पालिकेच्या सेवेत लागलेल्या चौघांनी येथील कायम नोकरीला सोडचिठ्ठी दिली.
घरकुल आणि इतर प्रकल्पांच्या निर्णयामुळे वादग्रस्त ठरलेल्या जळगाव महापालिकेचे आर्थिक गणित कर्जफेडीमुळे चुकलेले आहे. सद्या 2 हजार 250 कर्मचारी आणि निवृत्त झालेल्यांच्या पगार पेन्शनसाठी दरमहा सहा कोटींपेक्षा अधिक खर्च येतो. पालिकेला मिळणार्या उत्पन्नाच्या तुलनेत आस्थापनाचा खर्च 60 टक्केपेक्षा अधिक गेला आहे. कर्जफेड, पगार, पेन्शन आणि अत्यावश्यक सुविधांसाठी होणारा खर्च पाहता प्रशासनाला दरमहिन्याला ओढाताण होते. याची कल्पना अधिकारी आणि कर्मचार्यांनाही आहे. सहावा वेतन आयोग जाहीर होऊन अद्याप पालिका कर्मचार्यांना फरकाची रक्कम मिळालेली नाही. आस्थापना सूचीचा घोळ असल्याने निवृत्तीला पोचलेल्यांना पदोन्नती आणि इतर सुविधांचा लाभ मिळालेला नाही. असे असले तरीही पालिकेच्या सेवेत येण्यास अजूनही अनेकांची धडपड सुरू असताना दुसरीकडे चौघांनी कायम नोकरीला सोडचिठ्ठी दिली आहे. वर्षभरापूर्वी तत्कालीन आयुक्त प्रकाश बोखड यांच्या कारकिर्दीत झालेल्या विशेष अनुशेष भरतीत रुजू झालेल्यांनी काही दिवसांतच येथील परिस्थिती पाहून महसूल विभागाकडे वळणे योग्य समजले आहे.
स्वेच्छानिवृत्तीची मानसिकता
पालिकेच्या विविध विभागात कनिष्ठ अभियंत्यांकडे अतिरिक्त पदभार आहे. इतर विभागातही तीच स्थिती असल्याने अनेकांकडून सेवानिवृत्तीची मानसिकता आहे.
विशेष अनुशेष भरतीच्या माध्यमातून मंगेश वानखेडे यांची लिपिक पदावर नियुक्ती झाली होती. मात्र, नियुक्तीच्या दोन-तीन महिन्यांतच त्यांनी नोकरीचा राजीनामा देत पर्यायी नोकरीचा मार्ग पत्करला.
याच पद्धतीने विशेष अनुशेष भरतीमधील लिपिक पदावर नियुक्ती झालेल्या सुनील बोधे यांनीही पालिकेच्या सेवेला सोडचिठ्ठी दिली आहे. पालिकेच्या आस्थापना विभागात लिपिक पदावर कार्यरत पंकज सोनवणे यांनी पोलिस विभागासाठी निघालेल्या जागेसाठी परीक्षा दिली. यात उत्तीर्ण झाल्यावर धुळे पोलिस अधीक्षक कार्यालयात लिपिक म्हणून जाणे पसंत केले.
पालिकेच्या अर्थ विभागात लिपिक पदावर कार्यरत सुभाष परशुराम गिरी यानेही महसूल विभागाची परीक्षा दिली. या माध्यमातून धुळे महसूल विभागात लिपिक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे.