आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रामानंदनगरातून दीड ट्रक भाजीपाला ताब्यात, पालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - बळीरामपेठ,सुभाष चौकासह आता नव्याने वाढत असलेल्या अतिक्रमणावर महापालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी महाबळ, रामानंदनगरमधील चर्च, गिरणा टाकी, मू. जे. महाविद्यालय परिसर येथील भाजीपाला विक्रेत्यांवर पोलिस बंदोबस्तात जप्तीची कारवाई करण्यात अाली. यात तब्बल दीड ट्रक भाजीपाला जप्त करून ताे बालसुधारगृहाला पाठविण्यात आला आहे.
सुभाष चौक, बळीरामपेठ येथील हॉकर्सवर कारवाई सुरू असतानाच शहरातील रामानंदनगर, महाबळ, मू. जे. महाविद्यालय परिसरात नव्याने अतिक्रमण वाढत चालले होते. यात ९० टक्के हॉकर्स हे भाजीपाला विक्रेते आहेत. यासंदर्भात गेल्या दोन महासभांमध्ये अनेक नगरसेवकांनी चर्चा केली. प्रशासनाने या भागातही कारवाई करावी अन्यथा भविष्यात हा भाग पूर्णपणे अतिक्रमीत होऊन नंतर हॉकर्सला हटवणे कठिण जाईल, अशी शक्यता वारंवार व्यक्त केली जात होती. त्यावर गांभीर्याने घेत शुक्रवारी अतिक्रमण विभागाने कारवाईला सुरुवात केली. पहिल्याच दिवशी तीन हातगाड्या, २५ ट्रे आणि दीड ट्रक भरून भाजीपाला जप्त करण्यात आला. आतापर्यंत झालेल्या कारवाईपैकी ही मोठी कारवाई मानली जात आहे. यात जप्त केलेल्या भाजीपाला साहित्यामुळे हॉकर्सला मोठा फटका बसला आहे. जप्त केलेला भाजीपाला बालसुधारगृह खोटेनगरमधील लिलाई मुलांचे बालक भवन येथे दिला आहे. कारवाई सुरूच राहणार असल्याचे मनपाने सांगितले.

आयुक्तांकडे बाजार समितीचा अहवाल
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बीओटी तत्त्वावर बांधण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलावरून सुरू असलेल्या वादात गुरुवारी नगररचना अधिकाऱ्यांकडे सुनावणी घेण्यात आली. यात आडत असोसिएशनने हरकत घेतली आहे. गुरुवारी दोन्ही पक्षांनी आपले म्हणणे मांडले आहे. तसा अहवाल शुक्रवारी नगररचना अधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे सोपवला आहे. त्यावर वरिष्ठ पातळीवरून अभिप्राय घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.

आसोदा रोडला झाला वाद
शुक्रवारीच सुभाष चौक, बळीरामपेठ यासह आसोदा रस्त्यावर नव्याने वाढणाऱ्या अतिक्रमणावरही कारवाई करण्यात अाली. कारवाईदरम्यान काही हॉकर्सने कर्मचाऱ्यांशी वाद घातले. मात्र, पोलिस बंदोबस्त असल्यामुळे हॉकर्सला माघार घ्यावी लागली. किरकोळ वाद वगळता या भागातही अतिक्रमण काढण्यात आले. दुपारी ११ ते या वेळेत ही कारवाई झाली.
बातम्या आणखी आहेत...