आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेटमध्येच वाहन अडकल्याने महापौरांनाही घडली पायी वारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - अाठवड्याचा पहिला दिवस महापाैरांसाठी गर्दीतून वाट काढत पायी चालत जाण्याचा ठरला. महापालिकेच्या अावारातील बेशिस्त पार्किंगमुळे वाहन गेटमध्येच अडकल्याने महापाैरांना दालनाकडे जाण्यासाठी पायी वारी करावी लागली. केवळ शहरातील रस्त्यांवरच नव्हे तर मनपातही बेशिस्त पार्किंग हाेते. त्यावर काेणाचे नियंत्रण नसते. कठाेर नियमांची अंमलबजावणी केली. पण काेणीच त्याला जुमानत नाही. पदाधिकारीही अाडवी-तिडवी वाहने लावण्यावरच समाधान मानतात. त्याचा फटका खुद्द महापाैरांनाच बसल्यामुळे त्यांचाही सात्त्विक संताप झाला.
महापालिकेत साेमवारी वाहनांची गर्दी झालेलीच हाेती. मात्र, ही वाहने अशी लावण्यात अाली हाेती की, त्यातून पायी चालणाऱ्यालाही मार्ग काढता येणे शक्य नव्हते. सकाळी अकरा वाजेपूर्वी अावारात वाहनांची काेंडी झाली. त्याचवेळी महापाैर जयश्री अहिरराव यांचे एम.एच.-१५ इ.जे ४१०० हे वाहन गेटपर्यंत अाले. मात्र ते गेटपासून पुढे जाऊ शकत नव्हते. मुळात महापाैरांसह इतर पदाधिकारी अधिकाऱ्यांचे वाहन लावण्यासाठी इमारतीच्या मागील बाजूला भिंतीलगत स्वतंत्र जागा अाहे. मात्र तिथपर्यंत वाहन घेऊन जाणे चालकाला शक्य हाेत नव्हते. गेटपासून पुढे डाव्या हाताला एक अॅम्बेसेडर कार त्यामागे मारुती स्विफ्ट वाहन लागलेले हाेते. भिंतीलगत दुचाकी लावल्यानंतर उर्वरित जागेत ही दाेन चारचाकी वाहने लावलेली हाेती. त्याचवेळी उजव्या हाताला कार पार्क केलेली हाेती. तर मधल्या सर्व माेकळ्या जागेत दुचाकी अाडव्या लावलेल्या हाेत्या. पार्किंग करताना काेणतेही वाहन सहज जाऊ शकणार नाही, अशी काेंडी वाहनधारकांनी केली हाेती. त्याचवेळी ही सगळी मंडळी अापापल्या कामासाठी मनपाच्या इमारतीत गेल्यामुळे महापाैरांचे वाहन अाले तेव्हा वाहने हटवायला काेणीही अावारात नव्हते. त्यामुळे गेटपासूनच वाहनातून खाली उतरून महापाैर जयश्री अहिरराव यांना पायी चालत जावे लागले.

मनपात प्रवेशद्वारापासून जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी आवारात वाहने लावण्यात येतात. ही वाहने लावताना ती किमान शिस्तीत लावावी, अशी अपेक्षा असताना वाहने मात्र अगदी अस्ताव्यस्तपणे लावण्यात आल्याचे चित्र दररोज पाहावयास मिळते. त्यासाठी मनपा प्रशासनाने एका कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे. मात्र त्यानंतरही वाहनांच्या शिस्तीत फरक पडलेला नाही. प्रवेशद्वारापासून आत जाताना असलेल्या रस्त्यातच वाहने लावल्याने पुढे जाण्यासाठी महापालिकेतून बाहेर येण्यासाठी रस्ता राहत नाही. मोठी वाहने तर जाऊच शकत नाही. दुचाकी वाहने सरकवून रस्ता करून निघून जातात. सकाळी महापालिका कार्यालय सुुरू होण्याच्या वेळेतच जास्त गर्दी असते. त्याचाच फटका महापालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांना बसत आहे.

पार्किंगमध्ये करणार सुधारणा
^सध्या मनपाच्या विविध विभागात शिस्त लावली जात आहे. पार्किंगमध्येही यापूर्वी सुधारणा केली होती. अाता पुन्हा तीच शिस्त अवलंबली जाईल. त्यासाठी स्वतंत्र सुरक्षारक्षक नियुक्त केले जातील. - डॉ.नामदेव भोसले, आयुक्त,महापालिका

पार्किंगसाठी जागेचे नियोजन करा
महापालिकेच्या आवारातच पार्किंगसाठी जागेचे नियोजन करून तेथेच वाहने लावण्याची सक्ती करावी. त्याचप्रमाणे नागरिकांकडून दंडाची आकारणी करावी. पार्किंगसाठी आवारात दाेरखंडाचाही वापर करू शकतात. मात्र तशी व्यवस्था होताना दिसत नाही.

प्रशासनाचे सगळेच प्रयोग ठरले अयशस्वी
महापालिका प्रशासनाने बेशिस्त पार्किंगला शिस्त लावण्यासाठी काही प्रयोग केेले. मात्र, त्यानंतरही फरक पडलेला नाही. सुरक्षा रक्षक नियुक्त केले होते. तेही नंतर बंद केले. मागील आठवड्यात सर्व वाहनांना मनपात प्रवेशबंदी केल्याने बाहेर रस्त्याच्या कडेला वाहन लावल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. एकही उपाय कामी येत नाही, अशी स्थिती सध्या मनपात झाली असल्याचे दिसते. यावर तोडगा काढायला हवा.