आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडकरींच्या दौऱ्यासाठी रस्ते दुरुस्तीस पालिकेचा नकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शुक्रवारच्या नियोजित दौऱ्यासाठी रस्ते दुरुस्ती आणि बॅरिकेडिंग करण्यासाठी पोलिस प्रशासनाने महापालिकेला पत्र दिले अाहे. मात्र, तिजोरीत खडखडाट असल्याचे कारण पुढे करीत पोलिस प्रशासनानेच रस्ते दुरुस्ती, बॅरिकेडिंग करून घ्यावे असा सल्ला मनपाने पत्राद्वारे दिला आहे. पालिकेच्या या पत्रामुळे पोलिस प्रशासन पेचात पडले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मुकुंदराव पणशीकर यांच्या स्मृतिग्रंथाच्या प्रकाशन समारंभासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे शुक्रवार,२३ सप्टेंबर रोजी जळगाव दौऱ्यावर येत आहेत. झेड प्लस दर्जा आणि विशेष सुरक्षेच्या कारणामुळे पाेलिस प्रशासनाने दौऱ्याची तयारी सुरू केली अाहे.

रस्त्याच्या कारणावरून मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनास अडचण निर्माण हाेण्याची शक्यता लक्षात घेऊन पाेलिसांनी रस्ते दुरुस्ती बॅरिकेडिंग करण्याची सूचना पालिकेला केली अाहे. यासंदर्भातील पत्र साेमवारी, १९ सप्टेंबर रोजी प्राप्त झाले. त्यावर पालिकेनेही पाेलिसांना पत्र लिहुन उत्तर दिले असून त्यात पाेलिसांच्या मदतीला नकार दिला अाहे. त्यामुळे पोलिसांची गोची झाली आहे.
खरे कारण काय?
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली होती. त्यासाठी पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी मनपाने केली होती. मात्र, पालिकेकडे आधीच्या बंदोबस्ताचे सुमारे साडेसहा लाख रुपयांची थकबाकी असल्याचे कारण देऊन पोलिसांनी बंदोबस्त देण्याचे नाकारले होते.
पालिकेने अजेंड्यावर घेतलेल्या विषयात पाेलिसांच्या असहकार्यामुळे माेठी अडचण निर्माण झाली होती. पालिकेने माेठ्या मेहनतीने काढलेले अतिक्रमण पुन्हा निर्माण झाले. पैसे भरा तेव्हाच बंदाेबस्त अशी भूमिका पाेलिसांनी घेतली हाेती.

अाता पाेलिस बंदाेबस्ताच्या दृष्टीने बॅरिकेडिंग करणे गरजेचे अाहे. नेहमी पालिकेच्या माध्यमातून ती मदत हाेत असे. परंतु, अतिक्रमण हटाव मोहिमेचा अनुभव लक्षात ठेवून पालिकेने अाता अार्थिक परिस्थिती नाजूक असल्याचे कारण पुढे केले आणि तुम्हीच तुमची जबाबदारी पार पाडा, असा सल्ला देऊन मनपाने आपले हात झटकले आहेत.

नाजूक परिस्थितीचे कारण केले पुढे
महापालिकेने पाेलिसांना दिलेल्या पत्रात महापालिकेच्या नाजूक अार्थिक स्थितीचे कारण पुढे केले अाहे. गडकरींच्या दाैऱ्यात त्यांच्या अागमन प्रयाणाच्या मार्गावर बॅरिकेडिंगचे काम मनपाच्या खजिन्यातून करणे शक्य हाेणार नाही. पालिकेची अार्थिक परिस्थिती खराब असल्याने बॅरिकेडिंगचे काम पाेलिस प्रशासनाने त्यांच्याच विभागामार्फत करून घ्यावे, असे मनपाने उलट टपाली कळवले आहे.
बातम्या आणखी आहेत...