आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुनर्मूल्यांकनाच्या कामाचे आता क्रॉसचेकिंग

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - महापालिकेने शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी मुंबई आणि नागपूर येथील खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. या कंपनीने के लेल्या पुनर्मूल्यांकनाच्या कामाची महापालिका प्रशासनातर्फे क्रॉसचेकिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी कर्मचा-याची नियुक्ती झाली आहे. संबंधित कंपनीने पुनर्मूल्यांकनाचे काम योग्य पद्धतीने केले किंवा नाही याची पाहणी करण्यासाठी क्रॉसचेकिंग होणार आहे.
महापालिकेच्या वसुली विभागातील अपहार आणि त्यानंतर घडलेल्या अग्निकांडामुळे वसुली विभागातील अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. त्यामुळे महापालिकेत मालमत्ताधारकांच्या माहितीचे कोणतेही कागदपत्रे नाहीत. त्यामुळे शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्यानुसार हे काम सुरू करण्यात आले आहे. नागपूर आणि मुंबई येथील दोन कंपन्यांच्या माध्यमातून हे काम होत आहे. संबंधित कंपनीचे कर्मचारी मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करताना नागरिकांकडून पैसे मागत असल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी निदर्शनास आला होता. त्यानुसार दोन कर्मचा-याना चंदननगरातील नागरिकांनी पैसे मागत असताना पकडले होते. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध देवपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला. त्यामुळे या ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनातर्फे संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यापूर्वी संबंधित कंपनीने शहरात ज्या मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केले आहे त्यापैकी 20 टक्के मालमत्तांचे क्रॉसचेकिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी महापालिकेतील काही कर्मचा-याची नियुक्ती करण्यात आली आहे. सार्वजनिक, मोठे हॉस्पिटल, व्यापारी संकुल, मोठ्या इमारती आदींची तपासणी केली जाणार असल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली. क्रॉसचेकिंग झाल्यानंतर संबंधित ठेकेदारांचा ठेका रद्द करण्याबाबतच्या प्रस्तावावर अंतिम निर्णय होऊ शकतो.
नगरसेवकांच्या तक्रारी - शहरातील मालमत्ता पुनर्मूल्यांकनासाठी नेमलेल्या ठेकेदारांबद्दल शहरातील नागरिकांकडून पैसे मागणे, दमदाटी करणे आदी प्रकारांबाबत नगरसेवकांकडे तक्रारी आल्या. त्याबाबत नगरसेवक, नगरसेविकांनी प्रशासनाला याची माहिती देऊन संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाकडून ठेकेदाराला चार वेळा नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या. तरीही देखील ठेकेदाराच्या कामकाजात फारसा फरक पडला नाही. सातत्याने तक्रारी येत असल्याने अखेर प्रशासनाकडून हा निर्णय घेतला गेला आहे.
* मालमत्ता पुनर्मूल्यांकनाच्या क्रॉसचेकिंगसाठी महापालिकेकडून चार ते पाच कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. ते निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे क्रॉसचेकिंग करतील. गरज भासल्यास आणखी कर्मचारी नेमले जातील. - पल्लवी शिरसाठ, उपायुक्त