जळगाव- दोनमहिन्यांचे थकलेले पगार आणि महागाई भत्त्याच्या फरकाची रक्कम मिळावी, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी शनिवारी पालिकेबाहेर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांची आमदार सुरेश भोळे यांनी भेट घेतली. त्यांच्या अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी त्यांनी सोमवारी
आपल्या निवासस्थानी एक बैठक बोलावली आहे.
पालिकेच्या प्रांगणात दुपारी वाजता शहीद भगतसिंग कर्मचारी संघटना तसेच अखिल भारतीय सफाई मजदूर संघातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. कर्मचाऱ्यांना सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा पगार मिळालेला नाही, तसेच महागाई भत्त्याच्या फरकाची रक्कमही मिळालेली नाही. रथोत्सव तसेच मोहरम जवळ येत असताना कर्मचाऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने प्रशासनाने तातडीने पगाराची व्यवस्था करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांतर्फे करण्यात आली. या वेळी अतिरिक्त आयुक्त साजीद पठाण यांना निवेदन देण्यात आले.
कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची रक्कम देण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. त्या पाठोपाठ पगाराची रक्कमदेखील देता येईल का? या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी आंदोलकांना सांगितले. आमदार सुरेश भोळे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन सहानुभूती व्यक्त केली. कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी सोमवारी आपल्या निवासस्थानी बैठक घेतली आहे. या बैठकीस संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आंदोलनात शहीद भगतसिंग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल नाटेकर, अखिल भारतीय सफाई मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष अजय घेंगट, बळीराम पाटील, मुरलीधर खडके, प्रवीण भांडारकर, अनिल पाटील, अयुब खान, विपिन हिरवणे यांच्यासह इतर कर्मचारी सहभागी झाले होते.
आमदार सुरेश भोळे यांची मध्यस्थी; सोमवारी चर्चेसाठी घेणार बैठक
पालिकेच्या हद्दीत वैद्यकीय सेवा देणाऱ्या मानसेवी परिचारिकांनीही मानधन वाढवून मिळावे, या मागणीसाठी प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यांना मिळणारे ७५० रुपये एवढे मानधन तुटपुंजे असून यात वाढ करण्याची मागणी याद्वारे करण्यात आली आहे. या वेळी प्रतिभा पाटील, छाया बिरारी, योगीता सोळंके, लता रायसिंगे, अर्चना पाटील, सुनीता सोनवणे, प्रमिला सहारे, जयश्री शिंपी, अरुणा चौधरी आदी उपस्थित होते.