आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipality Officer Goes To People's House For Aadhar Card

आता अधिकारीच म्हणताय.. या अन् ‘आधार’ घेऊन जा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- लग्नाचं निमंत्रण देताना जसं चुलीस नेवतं धाडावं, तसं आता महापालिकेच्या अधिकार्‍यांना आधार कार्डाच्या नोंदणीसाठी आवतण धाडावं लागत आहे. घरातल्या सर्वांनी आधार नोंदल्याशिवाय राहू नये, असे कळकळीचे आवाहन करावे लागत आहे. एरव्ही नोंदणीसाठी प्रचंड झुंबड उडत होती. आता मात्र नोंदणी कमी झाल्याने एजन्सी काम थांबविण्याच्या मानसिकतेत असल्यानेच नोंदणीसाठी प्रशासन अगतिक झाल्याचे चित्र आहे.

आधार नोंदणीचा ओघ शहरात ओसरला आहे. नोंदणी कमी झाल्याने एजन्सी पळून जाण्याच्या मानसिकतेत असल्याने प्रशासनाला या आणि ‘आधार’ नोंदणीसाठी नागरिकांना बोलावण्याची गरज पडली आहे. दोन महिन्यांत शहरातील 42 हजार 500 नागरिकांची नोंदणी झाली आहे. अजूनही 1 लाख 33 हजार नागरिकांची नोंदणी बाकी आहे.

जळगाव महापालिका हद्दीत पहिल्या टप्प्यात 1 लाख 75 हजार नोंदणी झाल्यावर वर्षभर नोंदणीचे काम बंद होते. दुसर्‍या टप्प्यात जिल्ह्यात काम सुरू असताना महापालिका हद्दीत मात्र नोंदणी होत नसल्याकडे ‘दिव्य मराठी’ने याकडे लक्ष वेधले होते. यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी दोन एजन्सीला शहरात काम करण्यासाठी नियुक्त केले होते. फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा नोंदणीला सुरुवात झाल्यावर सुरुवातीला पालिकेच्या सहाव्या मजल्यावर सुरू केलेल्या केंद्रात प्रचंड गर्दी होत होती. त्यामुळे प्रशासन व एजन्सीदेखील हैराण झाले होते. त्यानंतर एप्रिल व मेच्या पहिल्या आठवड्यात प्रतिसाद ओसरल्याने दोनपैकी एका एजन्सीने नोंदणीचे काम थांबविले. दुसरी एजन्सीदेखील आपला कारभार आटोपण्याच्या मानसिकतेत आहे. नियुक्त एजन्सीने पलायन केल्यास प्रशासनासाठी ते अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांनी यावे, नोंदणी करून जावे, असे कळकळीचे आवाहन करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

दोन महिन्यांत 42 हजार नोंदणी
महापालिका हद्दीत आधार नोंदणीसाठी दोन एजन्सी नियुक्त करण्यात आल्या होत्या. यातील र्शीकृष्ण खानसरीतर्फे दोन महिन्यांत 32 हजार 500 नोंदणी पूर्ण झाली आहे, तर स्ट्रॅटेजिक आउटसोर्सिंग सर्व्हिसेसतर्फे 10 हजार नोंदणी झाली आहे.