आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिरसोलीच्या तरुणाचा दगडाने ठेचून खून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शिरसोली येथील 22वर्षीय तरुणाचा तेथून जवळच असलेल्या रामदेववाडी शिवारातील जांभोळा टेकडीच्या परिसरात दगडाने ठेचून खून झाल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेतील हल्लेखोर पसार झाले असून, त्याचा खून कोणी व का केला? हे मात्र समजू शकलेले नाही. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरसोली प्रबो येथील अशोक मधुकर बारी (वय 22) याची रामदेववाडी शिवारातील जांभोळा टेकडीच्या परिसरात शेती होती. दररोज रात्री तो शेतात पाणी भरण्यासाठी जात असे. नेहमीप्रमाणे रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास तो पाणी भरण्यासाठी गेला; मात्र त्यानंतर घरी परतलाच नाही. त्यामुळे त्याच्या नातेवाइकांनी अशोक घरी का आला नाही, हे पाहण्यासाठी शेताकडील रस्त्याने जाऊन पाहणी केली असता, त्यांना जांभोळा टेकडीच्या परिसरात त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात माहिती दिल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्यासह त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. या वेळी अशोकचा खून डोक्यात दगड घालून केल्याचे पोलिसांना आढळून आले. याप्रकरणी विठ्ठल किसन बारी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइलही गायब!
अशोक अविवाहित होता. तसेच त्याच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झालेले आहे. घटनास्थळी गौरीनामक श्वानाकडून तपासणी केली असता, परिसरात त्याच्या रुमालाव्यतिरिक्त काहीही आढळून आले नाही. शिवाय त्याचा मोबाइलदेखील घटनास्थळी आढळून आला नाही. सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर तपास करत आहेत.

अपघातात तरुणाचा मृत्यू
रेल्वेस्थानकाकडून जिल्हा परिषदेकडे जाणार्‍या मार्गावरील हॉटेल निसर्गजवळ महापालिकेच्या टॅँकरने पायी जात असलेल्या एका परप्रांतीय तरुणाला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात बिहारमधील रहिवासी राजकुमार उर्फ कमल कन्हाइप्रसाद गुप्ता (वय 45) याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. महापालिकेचा पाणी वाहून नेणारा टॅँकर (क्र. एमटीएस-9012) हॉटेल निसर्गकडून जात होता. या टॅँकरने पायी जाणार्‍या तरुणाला धडक दिली. धडकेने खाली कोसळून तो जखमी झाला व त्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला. गर्दीतील एका तरुणाने त्याला ओळखले. मृत तरुण शहरातील हॉटेल अवधूतमध्ये वेटरचे काम करत असल्याची माहिती पुढे आली. तो गेल्या आठ दिवसांपासून सुटीवर असल्याचे व बिहारमधील रहिवासी असल्याचेही सांगण्यात आले. महापालिकेचा कर्मचारी नारायण चांदेलकर हा टॅँकर चालवत होता. चालकाला ताब्यात घेतले आहे.