आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगीताच्या तालावर टरबूजचा आस्वाद, आर.वाय.पार्क कॉलनीत आगळीवेगळी पार्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - आपण गोंधळ, जावळ, वाढदिवस, लग्न असे समारंभ साजरे करीत असतो. त्यासाठी पत्रिका, म्युझिक सिस्टीमसह अनेक गोष्टींची व्यवस्था करण्यात येते. मात्र, शहरातील आर.वाय.पार्क कॉलनीतील एका रहिवाशाने चक्क टरबूज पार्टीचे आयोजन करून आगळावेगळा उपक्रम राबवला.

आर.वाय.पार्कमधील रहिवासी महावीर वर्मा यांनी टरबूज पार्टीचे रविवारी आयोजन केले होते. त्यासाठी त्यांनी पत्रिकादेखील छापल्या होत्या. व्यावसायिक असलेले वर्मा यांना टरबूज खूप आवडते. मारवाडी समाजात याला मतिरा पार्टी म्हटले जाते. कुटुंब, मित्र परिवाराने एकत्र येऊन मजा आणि धमाल करावी या उद्देशाने पार्टी करण्यात आली. अशा प्रकारचा उपक्रम शहरात प्रथमच राबवण्यात आला.

आकर्षक आकारात टरबूज

वर्मा यांनी घरासमोर मंडप लावला होता. केवळ कलिंगड खाण्यासाठी लोकांना कसे बोलावणार याकरिता खान्देशी जेवणही ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे ६० टरबुजांची ऑर्डरही त्यांनी दिली होती. संगीताच्या तालावर थिरकत टरबुजांचा आस्वाद आलेल्या पाहुण्यांनी घेतला. उन्हाळ्यात खासकरून कलिंगड खाल्ले जातात. त्यामुळे समर पार्टीची मजा यात लुटण्यात आली. समारंभासारखेच पूर्ण पार्टीचे आयोजन करण्यात आल्याने निमित्त नसताना ही कसली पार्टी म्हणून अनेकांनी उत्सुकतेने पार्टीत हजेरी लावली. तसेच सोपान महाजन, सोनू महाजन, योगेश महाजन यांनी आकर्षक पद्धतीने हार्ट, चौकोनी, गोल, ढोल, कासव यासारख्या विविध आकारात हे कलिंगड कापून सजावट केली होती.
इतरांना खाऊ घालण्यात आनंद

मला कलिंगड आधीपासूनच आवडतात. ते स्वत: खाण्यास आणि इतरांना खाऊ घालण्यात मला खूप आनंद मिळतो. त्यामुळे माझे मित्र मला नेहमी विचारायचे की कलिंगड पार्टी केव्हा देतोय. यावर्षी ही पार्टी करण्याचा माझ्या मनात विचार आला. तो विचार प्रत्यक्षात ‌उतरवण्यासाठी मी या आगळ्यावेगळ्या पार्टीचे आयोजन केले.