आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगीताच्या अथांग सागरात पोहण्यासाठी निरंतर ‘रियाझ’ महत्त्वाचा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- सातार्‍यातील औंध संगीत महोत्सवात गेल्या तीन वर्षांपूर्वी शास्त्रीय गायन केले. रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटाने भरभरून दाद दिली. पद्‍मश्री पंडित उल्हास कशाळकर यांचीही उपस्थिती होती. गायन संपल्यानंतर पाठीवर कौतुकाची थाप मारून ते म्हणाले, ‘बेटा गायन खूपच छान झालं. स्वरातील ‘सफाईदारपणा’ आणखी वाढला पाहिजे, त्यासाठी सातत्याने रियाझ करीत राहा’, त्यांनी केलेले कौतुक अन् दिलेल्या मंत्रातून गायनाची स्फूर्ती मिळाली, अशी भावना डोंबिवलीची शास्त्रीय गायिका नूपुर काशिद हीने येथे व्यक्त केली.

भुसावळच्या आयएमए हॉलमध्ये शनिवरी रात्री तिची शास्त्रीय, उपशास्त्रीय गायनाची मैफिल झाली. त्यानिमित्ताने तिने ‘दिव्य मराठी’शी खास संवाद साधला. ती म्हणाली की, आई-वडिलांना गायनाची खूप आवड आहे. प्राथमिक शिक्षण सुरू असतानाच मला गायनाची गोडी लागली. वयाच्या तेराव्या वर्षी डोंबिवलीत ‘र्शी गणेश मंदिर संस्थान’मध्ये पहिल्यांदा खुल्या संगीत मैफलीत शास्त्रीय गायन केले. त्यात ‘यमन राग’ रसिकांना चांगलाच भावला. हात उंचावून त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिल्याने नवी उर्मी, नवा जोश संचारण्यास मदत झाली. समोरच गुरुवर्य पंडित मधुकर गजाननराव जोशी हे बसलेले होते. त्यांनीही ‘अरे व्वा, शाब्बास बेटा’ अशा शब्दात कौतुक केले. त्यांच्याकडे सध्या ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर या तिन्ही घराण्यांच्या गायकीची तालिम सुरू आहे. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पुरस्कार मिळाले; पण वयाच्या सतराव्या वर्षी ऑल इंडिया रेडिओ संगीत स्पर्धेत जे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले ते संस्मरणीय असेच आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा अशा विविध राज्यांमध्ये अतिशय कमी वयातच संगीत मैफलीत गायनाची संधी मिळाली हे मी माझं सद्भाग्यच समजते. शास्त्रीय, संगीताची अभिरूची वाढली पाहिजे, हाच ध्यास घेतला आहे. पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाही दररोज किमान सहा तास ‘रियाझ’ आणि तालिम करण्यावर भर दिला आहे. गुरुवर्य पंडित मधुकर जोशी, पंडित गजाननराव जोशी, ‘सूर्शी’ केसरबाई केरकर, हिराबाई बडोदेकर अशा संगीत या विभूतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल सुरू आहे.

पुरस्कारांची अशी ही भली मोठी रास
नूपुर काशिद ही बी.कॉम. झालेली आहे. ती एम.ए.म्युझिकमध्ये करीत आहेत. कमी वयात तिला प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यात पंडित राम मराठे स्मृती (2006), सुधीर फडके स्मृती (2006), पंडित व्ही.डी.पळूसकर अवॉर्ड (2007) या पुरस्कारांचा समावेश आहे. राष्ट्रीय 10 स्पर्धांमध्ये ती प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. डीडी सह्याद्री वाहिनीवर एम-टू, जी-टू हा कार्यक्रम तिने गाजविला आहे. ती सध्या मुंबई आकाशवाणी केंद्रावर ‘बी हाय ग्रेड आर्टिस्ट’ म्हणून गायन करीत आहे.

शास्त्रीय संगीत गायनाचा मुलाधार
संगीत हे समुद्रासारखे अथांग आहे. त्यात यशस्वीपणे पोहायचे असेल तर त्यासाठी ‘रियाझ’ महत्त्वाचा आहे. शास्त्रीय संगीत हा गायनाचा मुलाधार आहे, हे दर्दी कलारसिकांनी लक्षात घेतले पाहिजे. संगीत विषयात पीएच्.डी. करण्याचा मानस आहे. संगीत सेवा करून ‘उत्तम’ कलाकार होण्याची अभिलाषा आहे, असेही नूपुर काशिद हिने आवर्जून सांगितले.

खान्देशातील रसिकता मनाला भावतेय
शास्त्रीय गायनाच्या मैफलींना गर्दी नसली तरी दर्दींची उपस्थिती असते. निव्वळ गर्दी हे अभिरूचीचे परिमाण अजिबात नाही. तीन वर्षांपूर्वी जळगावात गायनाचा योग आला होता. त्यानंतर भुसावळात गायनाची संधी मिळाली. खान्देशातील रसिकता भावली आहे. एखादी रचना आवडल्यानंतर कंजुषपणा न करता भरभरून टाळ्या येथील मैफलींमध्ये मिळतात हीच खान्देशाची खासियत आहे, अशी भावनाही नूपुर काशिद हिने व्यक्त केली.