आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम मराठी साहित्य संमेलन: साहित्यिकांनी व्यवस्थेशी संघर्ष समजून घ्यावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- साहित्यातून व्यवस्थेचा व्यवस्थेशी होणारा संघर्ष योग्य प्रकारे समजून घेतला जात नाही. परिणामी, लिखाणातील विकृतीचे चित्रीकरण मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे साहित्यिकांनी धर्माबद्दल लिखाण करताना व्यवस्थेशी होणारा संघर्ष समजून घेण्याची गरज असल्याचा सूर रविवारी परिसंवादातून व्यक्त करण्यात आला.

मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे मुस्लिम मराठी साहित्य संमेलनात रविवारी ‘महाराष्ट्रातील मुस्लिम जगत आणि मराठी साहित्य’ या विषयावर परिसंवाद झाला. परिसंवादात सहाव्या शतकापासून एकविसाव्या शतकापर्यंतचा इस्लामच्या इतिहासासह महाराष्ट्रातील मुस्लिम जगतावर विविधांगाने मुद्दे मांडले. प्रा.जावेद पाशा कुरेशी (नागपूर) अध्यक्षस्थानी होते. जमिल देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

मुस्लिमांविषयी अभ्यास पूर्वग्रहदूषित

महाराष्ट्रात मुस्लिम जगत वेगळे आहे का, असा सवाल करीत डॉ. बशारत अहमद (उस्मानाबाद) यांनी लेखकांचे अभ्यासाचे निष्कर्ष ठरलेले असतात, असे सांगितले. कोणत्याही विषयाचा संदर्भ बनवताना पदरचे शब्द घातले जातात. त्यामुळे एखाद्या समाजाचा अभ्यास करताना सखोल अभ्यास करण्याचे कधीही वाटत नाही. खान्देशी मुसलमान, पुणेरी मुसलमान, बंबय्या मुसलमान, नागपुरी मुसलमान अशा नावाने ही ओळख निर्माण केली जाते. आजवरच्या लिखाणात मुस्लिमांबद्दल दुर्गुणांचीच अपेक्षा केली जात आहे. त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षाच करता येत नाही, असे चित्र रंगविले जाते. त्यामुळे मुस्लिमांविषयीचा अभ्यास पूर्वग्रहदूषित असाच दिसतो. महाराष्ट्रात काही अभ्यासकांनी वास्तव चित्रण केले आहे. यात म. फुले, साने गुरुजी, प्रबोधनकार ठाकरे अग्रणी आहेत. मराठी साहित्यातून जे चित्रण येत आहे, ते वास्तवाच्या जवळ आहे. त्यामुळे आगामी काळात धर्मीयांबद्दलच्या लिखाणात पूर्वग्रहदूषित लिखाण असता कामा नये.

इतिहासाच्या चित्रणात विकृती

अन्वर राजन (पुणे) यांनी, मराठी जगतातील मुस्लिम फार वेगळा आहे, असे जे चित्र रंगविले जाते, ते चुकीचे व अर्धवट असल्याचे स्पष्ट केले. या चित्रणात खूप विकृती आहेत. संतांनी साहित्यात केलेली मांडणी वेगळी आहे. ब्रिटिशांनी हिंदू व मुस्लिमांत तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. धर्माच्या आधाराने ब्रिटिशांनी हिंदू व मुस्लिमांना गुलाम बनविले. मात्र, हिंदू धर्मामध्ये सद्गुण आहे आणि सद्गुण ही विकृती आहे हे लिखाण सावरकरांच्या लिखाणात सापडते. महाराष्ट्र हे हिंदुत्ववादाचे आदर्श मानणारे महत्त्वाचे केंद्र आहे. गेल्या दशकांपासून साहित्य संमेलनात मुस्लिमांना स्थान मिळू लागले. भारतात प्रादेशिक भाषांच्या लिखाणात मुस्लिमांच्या वाट्याला उपेक्षा आली आहे. महाराष्ट्रात ज्ञानपीठाच्या पुरस्कारात पाच मुस्लिम आहेत. साहित्य अकादमी पुरस्कारात मुस्लिम प्रतिनिधी नाही. यातून प्रादेशिक भाषेमध्ये लिहिणार्‍या मुस्लिमांची उपेक्षा होत आहे. प्रादेशिक मुस्लिम भाषा धोक्यात आल्या आहेत. इंग्रजी भाषेचा रेटा पुढे येत आहे. या लिखाणातून विकृती दिसून येते.

सुफींमुळे मिळाली मराठी साहित्याला प्रेरणा

प्रा.फ.म.शहाशिंदे (लातूर) यांनी सांगितले की, मुस्लिम म्हणजे शूद्रातिशूद्र आजवर मानले गेले आहे. मात्र, त्यामागील इतिहास शोधण्याचा प्रयत्न आजवर झाल्याचे दिसून येत नाही. प्रादेशिक भाषांमधून लिहिण्याची सुरुवात सुफींनी केली आहे. मराठीला ज्ञानभाषा करण्याची प्रेरणा सुफींमुळे मिळाली. मराठी साहित्याची निर्मिती सुफींमुळे झाली आहे. ज्या लेखकांनी ग्रामीण मुस्लिम, दलित, आदिवासी मुस्लिम साहित्याची निर्मिती केली आहे. त्यांच्या साहित्यात विकृत चित्रण आढळत नाही. हिंदुत्वाच्या साहित्यात मुस्लिमांचे विकृत चित्रण आढळते. ते लिहिणारे आत्मकेंद्रित लेखक आहेत. वास्तवाचे भान नसलेल्या मुस्लिमांच्या जगण्याचे चित्रण केले आहे. आजच्या साहित्यात दोन्ही पद्धतीचे चित्रण दिसून येते.

साहित्यिकांनी समग्र क्रांती पुकारण्याची गरज
प्रा.जावेद पाशा कुरेशी(नागपूर) यांनी सांगितले की, विद्यापीठ नियामक आयोगाने मुस्लिम साहित्य संमेलनांना लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. हा लेखकांचा विजय आहे. मात्र, साहित्याचा हा प्रवाह सतत पुढे नेण्याची जबाबदारी पेलण्याची आवश्यकता आहे. आता सर्व राजकारण घसरत आहे. ते सावरण्याचे काम साहित्यिकांचे आहे. व्यवस्थेचा व्यवस्थेशी होणारा संघर्ष योग्य प्रकारे मांडला जात नाही. सुफींचे कार्य केवळ धर्मात एकात्मता मांडण्याचे नव्हते. व्यवस्थेला इस्लाम हवा आहे. मात्र, वर्णव्यवस्था नष्ट करण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. कोणता धर्म मानावा हे महत्त्वाचे नसून मानवता धर्म समजला गेला पाहिजे. व्यवस्थेची मेख लक्षात घेऊन मुस्लिम साहित्यिकांनी आपली मूळे शोधून मोठी भूमिका घेण्याची गरज आहे. विकृतीचे चित्रीकरण खालच्या स्तराचे होते. त्यामुळे साहित्यिकांनी समग्र क्रांती पुकारण्याची गरज आहे. परिसंवादातील साहित्यिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही वक्त्यांनी दिली.

मन आरसा जरी, दगडी स्वभाव त्यांचे..
‘मन आरसा जरी, दगडी स्वभाव त्यांचे’ यासह विविध कवितांनी समाजातील वास्तवतेवर प्रकाश टाकला. मुबारक शेख (सोलापूर) अध्यक्षस्थानी होते. खैरुन्निसा शेख, अश्फाक पिंजारी, बादशहा सय्यद (पुणे), अस्मिता गुरव, जमिल देशपांडे यांनी विविध कविता सादर केल्या. नामदेव कोळी यांनी हिशेब ही कविता सादर केली. शैलजा करोडे यांनी दुष्काळावर, तर किरण सोनी यांनी मोहल्ला, तसेच गो.शि.म्हसकर यांच्या सलाम कवितेला दाद मिळाली. मलिक नदीम यांच्या ‘मन आरसा जरी, दगडी स्वभाव त्यांचे. विरहातला पिता मी’ या कवितेने दाद मिळविली. डॉ. बशारत अहमद यांनी मुरादाबाद दंगलीवर कविता सादर केली. ‘लेटून सुख स्वप्ने माझी जरी कफल्लक केले होते, वेदनांनी आज मला केले श्रीमंत आहे..’ या शैलजा करोडे यांच्यासह प्रफुल्ल पाटील यांच्या ‘निर्बंध आसवांना मज घालता न आले, आव्हान हसण्याचे मज पेलता न आले’ या कवितांनी दाद मिळविली.