आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य खरेदीचेही लेखापरीक्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत (एनआरएचएम) जिल्ह्यात झालेल्या औषध व साहित्य खरेदीचे विशेष लेखा परीक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी पाच अधिकार्‍यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. यासंदर्भात विधानसभेत तारांकित प्रश्‍्न उपस्थित करण्यात आला होता.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत औषधे व साहित्य खरेदीत अपहार झाल्याचा आरोप झाला होता. याविषयावर विधानसभेत चर्चा झाली होती. त्या नंतर या प्रकरणाची प्राथमिक चौकशी झाली होती. या चौकशीत अनेक गंभीर प्रकार उघडीस आले होते. यापार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे 2007-08 ते 2011-12 या कालावधीत जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रामध्ये झालेल्या औषधे व साहित्य खरेदीचे विशेष लेखापरीक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आरोग्य विभागाचे मुख्य सचिव टी.सी.बेंजामीन तसेच प्रधान सचिव सुजाता सौनिक यांच्या आदेशानुसार चौकशी होणार आहे.विशेष लेखापरीक्षणाचा अहवाल 30 जानेवारीपर्यंत शासनाला सादर करण्याची सूचना जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांना करण्यात आली आहे.

या ठिकाणी तपासणी
17 ते 30 जानेवारी या कालावधीत परीक्षण करण्यात येणार आहे.18 जानेवारीला जिल्हा सामान्य रुग्णालय, 20 जानेवारीला उपजिल्हा रुग्णालय शिरपूर, दोंडाईचा, 21 जानेवारीला ग्रामीण रुग्णालय सोनगीर, शिंदखेडा, साक्री, 22 जानेवारीला पिंपळनेर, थाळनेर, जैताणे, 23 व 24 धुळे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, 25 व 26 साक्री तालुक्यातील प्राथमिक केंद्र व उपकेंद्र, 27 ते 28 जानेवारी शिंदखेडा तालुका, 29 व 30 जानेवारी रोजी शिरपूर तालुक्यातील प्राथमिक केंद्र व उपकेंद्राचे लेखापरीक्षण करेल. संस्थानिहाय संबंधित अधिकार्‍यांनी निर्धारित कालावधीचे दस्तावेज व अभिलेख उपलब्ध करून द्यावे.

उदय देशपांडेना परत घेण्याच्या हालचाली
एनआरएचएम घोटाळय़ाप्रकरणी ठपका ठेवण्यात आलेले उदय देशपांडे यांची जालना येथे बदली झाली आहे. त्यांना 4 जानेवारी रोजी कार्यमुक्त करण्यात आले आहे.त्यांना जालना येथे त्यांना रुजू करून घेण्यात आलेले नाही. सध्या लेखापरीक्षण सुरू असल्याने देशपांडे यांना पुन्हा जिल्हा परिषद धुळे येथे रुजू करून घेण्याबाबतच्या हालचाली सुरू झालेल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.दरम्यान अपहार प्रकरणातील तिघा कर्मचार्‍यांवर कारवाईच्या अँड.येशीराव यांच्या मागणी नंतर कोणतीच कार्यवाही झालेली नाही.

यांच्यामार्फत लेखापरीक्षण
लेखा परीक्षणासाठी स्थानिक लेखा परीक्षण विभागाचे सहायक संचालकांच्या नियंत्रणाखाली पाच जणांची समिती नियुक्त करण्यात आलेली आहे.त्यात लेखा परीक्षा अधिकारी एच.वाय.जगताप,वरिष्ठ लेखापरीक्षक ए.एस.पाटील (धुळे ), आर.एस.खाडे वरिष्ठ लेखापरीक्षक, कनिष्ठ लेखाधिकारी व्ही.एन.पाटील (जळगाव), वरिष्ठ लेखा परीक्षक एन.पी.शिंदे (नंदुरबार) यांचा समावेश आहे. प्राथमिक चौकशी अहवालात निदर्शनास आलेल्या गंभीर आक्षेप, सर्वसाधारण बाबीची बारीक चौकशी करण्यात येणार आहे.प्रत्येक ठिकाणी लेखा परीक्षकांनी बसून परीक्षण करावयाचे आहे.शुक्रवारी जिल्हा परिषदेतील एनआरएचएम विभागात समितीने प्राथमिक तपासणी केली.या वेळी सर्व प्रकारचे खरेदी कागदपत्रासह प्राथमिक माहिती जाणून घेतली.या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंद मोरे, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.संतोष नवले यांच्यासह कर्मचार्‍यांनी माहिती दिली.