आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्ये धान्याच्या दरांत 40 टक्के वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - दुष्काळामुळे यंदा बाजारपेठेत धान्य व दाळींची आवक मंदावली आहे. काही धान्यांच्या भावात 30 ते 40 टक्के वाढ झाली आहे. भाववाढीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. महिन्याचा किराणा भरताना सामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे.

नगरच्या आडते बाजारात मध्यप्रदेश, कर्नाटक, दिल्ली, हरियाणा या राज्यांसह चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यातून तांदळाची आवक होते. दोन वर्षांपासून पावसाने दडी मारल्याने तांदळाचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे आवकही कमी झाली आहे. साहजिकच भावात 30 ते 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आंबेमोहोर तांदळाच्या भावात चार महिन्यांपूर्वीच 40 टक्क्यांनी वाढ झाली. बासमतीचा भावही किलोमागे 30 रुपयांनी वाढला.

गव्हाची आवक प्रामुख्याने मध्य प्रदेशातून होते. यंदा राज्यातील गव्हाचे उत्पादन कमी झाले असले, तरी मध्य प्रदेशमधून गव्हाची आवक झाली आहे. दुष्काळामुळे गव्हाच्या भावातही 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

रोजच्या जेवणात समावेश असलेल्या तूर व मूगदाळीचेही भाव प्रचंड वाढले आहेत. दोन वर्षांपासून दाळींचे उत्पादन घटले असले, तरी उत्पादक व व्यापार्‍यांनी साठा करून ठेवल्यामुळे यंदा दाळीची फारशी टंचाई जाणवली नाही. आता मात्र दाळींचे भावही वाढले आहेत. काही महिन्यांपूर्वीच तूर दाळीचे भाव किलोमागे 10 ते 12 रुपयांनी वाढले. मूगदाळीच्या भावातही वाढ झाली आहे. गेली दोन वर्षे उत्पादकांनी तूर दाळीचा साठा करून ठेवला होता. आता हा साठा संपत आला आहे. त्यामुळे उत्पादकांनाही पावसाचे वेध लागले आहेत.

असे आहेत सध्याचे भाव (प्रतिकिलो)
गहू - 22 ते 32 रुपये, तांदूळ - 32 ते 120 रुपये, ज्वारी - 22 रुपये, तूरदाळ - 70 ते 78 रुपये, मूगदाळ - 80 रुपये, शेंगदाणे - 100 रुपये, पोहे - 36 रुपये.