आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्यातील नकाणेच्या गेटसाठी सव्वा कोटी - महापौर जयश्री अहिरराव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहराला पाणीपुरवठा करणा-या नकाणे तलावाच्या गेट दुरुस्तीचे सर्व अडथळे दूर झाले आहेत. पाटबंधारे विभागाने गेट दुरुस्तीसाठी एक कोटी 17 लाख 85 हजार रुपये खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. याबाबत महापालिकेने मागणी केली होती. त्यासाठी पाठपुरावाही केला होता, अशी माहिती महापौर जयश्री अहिरराव यांनी दिली. आता गेट दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
नकाणे तलावाच्या निर्मितीपासून गेट दुरुस्तीचे काम झालेले नाही. अनेक वर्षांपासून तलावाचे गेट नादुरुस्त झाल्याने त्यातून पाण्याची गळती होते. त्यामुळे पाणी वाया जाते. परिणामी पाणीटंचाई निर्माण होते. नकाणे तलावातून शहरातील 60 टक्के भागात पाणीपुरवठा करण्यात येतो. दोन वर्षांपूर्वी दुष्काळ पडल्याने तत्कालीन महापौर मंजुळा गावित यांच्या काळात गेट दुरुस्तीचा प्रयत्न झाला ; परंतु त्यासाठी लागणारा खर्च कोणी करायचा यावरून वाद निर्माण झाल्याने हा प्रश्न प्रलंबित होता. त्या वेळी केवळ आजूबाजूच्या भिंतींची दुरुस्ती करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून गेट दुरुस्तीचा मुद्दा प्रलंबित होता. याबाबत माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्याकडे महापौर जयश्री अहिरराव यांनी हा खर्च पाटबंधारे विभागाने करावा, अशी मागणी असलेले निवेदन दिले होते. त्यानुसार पाटबंधारे विभागाकडून गेट दुरुस्तीसाठी एक कोटी 17 लाखांच्या खर्चाला प्रशासकीय मंजुरी दिल्याची माहिती महापौरांनी दिली.

विहिरींच्या मजबुतीसह इतर कामांचा सहभाग
शासनाने नकाणे तलाव गेट दुरुस्तीसाठी खर्चास प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्यात या तलावातील शहर पाणीपुरवठा योजनेचे मुख्य विमोचक असलेल्या विहिरीच्या मजबुतीकरणासह तलावाचे मजबुतीकरण, विहीर आदींसह इतर आनुषंगिक कामे करण्यात येणार असल्याची माहिती महापौरांकडून देण्यात आली. त्यामुळे विहिरीच्या कामासह इतरही कामे मार्गी लागणार आहेत.

‘हरणमाळ’चा आधार
नकाणे तलावातील पाणी शहरासाठी पुरेसे ठरत नसल्याने तापी योजनेतून 40 टक्के भागात पाणीपुरवठा केला जातो. तसेच काही वर्षांपूर्वी अक्कलपाडा प्रकल्पाचा भाग म्हणून नकाणे तलावाजवळच हरणमाळ तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. यात 450 पैकी 200 एमसीएफटी जलसाठा हा शहरासाठी आरक्षित करण्यात आला आहे. गेट दुरुस्तीच्या वेळी हाच हरणमाळ तलाव शहरासाठी आधार ठरणार आहे. त्यातून शहराला कसा पाणीपुरवठा करता येईल याबाबतही विचार केला जाणार आहे.

दुरुस्तीसाठी लागेल वर्षाचा कालावधी
नकाणे तलावात सध्या जलसाठा आहे. तलावाची क्षमता 360 एमसीएफटी असून, सद्य:स्थितीत 70 एमसीएफटी जलसाठा आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाच्या पाण्यामुळे तलावात जलसाठा वाढेल. त्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी वर्षापेक्षा अधिक काळ लागणार आहे. कारण तलावातील जलसाठा कमी करूनच काम करणे शक्य आहे. तसेच तलावातून शहराला पाणीपुरवठा होत असल्याने प्रथम शहराच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करूनच काम करावे लागणार असल्याने त्यासाठी वर्षापेक्षा अधिकचा काळ लागणार आहे.

स्थायी समितीने केला होता ठराव
नकाणे तलाव गेट दुरुस्तीसाठी महापालिकेच्या स्थायी समितीच्या फेब्रुवारी 2013मध्ये झालेल्या बैठकीत ठराव करण्यात आला होता. त्या वेळी गेट दुरुस्तीसाठी 69 लाख रुपये खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली होती ; परंतु तलावाची मालकी ही पाटबंधारे विभागाकडे असल्याने देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी त्यांची असल्याने महापौर जयश्री अहिरराव यांच्याकडून हा खर्च पाटबंधारे खात्याने करावा, अशी मागणी रेटून धरण्यात आल्याने महापालिकेच्या लाखो रुपयांची बचत झाली आहे.