आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवापुरात महामोर्चा: शाळकरी मुलीवर अत्याचार; आरोपी भावांना फाशीच द्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवापूर (जि. नंदुरबार) - बेलदारवाड्यात राहणाऱ्या नऊवर्षीय मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ नवापूरमध्ये मंगळवारी महिलांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. परिसरातील दहा ते बारा गावांतील सुमारे १५ ते १६ हजार महिला व नागरिक या अत्याचाराविरोधात रस्त्यावर उतरले होते. बालिकेवर अत्याचार करणाऱ्या भावंडांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच या घटनेच्या निषेधार्थ नवापूर शहरासह तालुक्यातील चिंचपाडा, विसरवाडी, खांडबारा या गावांत कडकडीत बंदही
पाळण्यात आला.

नवापूर शहरातील बेलदारवाड्यात चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर तिच्या घराजवळ राहणाऱ्या दोन भावांनी मकरसंक्रांतीच्या दिवशी लैंगिक अत्याचार केला. पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. मात्र हे दोघेही अल्पवयीन असल्यामुळे त्यांची बालसुधारगृहात रवानगी करावी लागली. मात्र या घटनेमुळे पंचक्रोशीतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मंगळवारी नवापूर तालुक्यातील चिंचपाडा, विसरवाडी, खांडबारा, नंदुरबार परिसरातील हजारो लोकांच्या उपस्थितीत शहरातून महामोर्चा काढण्यात आला. आरोपींवर कारवाईचे पोलिसांना निवेदन देऊन नंतर तिथेच जाहीर सभाही घेण्यात आली. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हसमुख पाटील, माजी उपनगराध्यक्षा शैला टिभे, पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर दर्जी, बजरंग दलाचे प्रमुख राजेश यांनी उपस्थितांच्या वतीने मनोगत व्यक्त करत आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. आरोपींना कुणीही सहकार्य करू नये, असा इशारा देण्यात आला.
विविध सामाजिक संघटनांकडून निवेदन
या घटनेच्या निषेधार्थ नगराध्यक्षा, नगरसेवक, मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी प्रदीप पी यांना निवेदन दिले. नवापूर डॉक्टर्स असोसिएशनतर्फे तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना निवेदन देण्यात आले. या प्रकरणातील दोषींना कठोर शासन करावे, अशी मागणी जुम्मा मस्जिद ट्रस्टचे मुसाजी व्होरा, युसुफ मुसाजी टिमोल, अब्दुल सलाम आमलीवाल, सोहेल बलेसरिया, सलीम मलिक आदींनी केली आहे.
चोख पोलिस बंदोबस्त, अधिकाऱ्यांचे लक्ष
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकारी शहरात दाखल झाले होते. त्यात जिल्हाधिकारी प्रदीप पी, जिल्हा पोलिस अधीक्षक महेश घुर्ये, पोलिस उपअधीक्षक अनिता पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी शिवाजी गावित, गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक शिरीष पाटील आदींचा समावेश होता. तसेच शहर व परिसरात चोख पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
लैंगिक अत्याचारावर जनजागृती व्हावी
ही घटना अत्यंत खेदजनक आहे. याचा मी निषेध व्यक्त करतो. लैंगिक अत्याचारासंदर्भात जनजागृती होणे गरजेचे आहे. आरोपींना जास्तीत जास्त कशी शिक्षा होईल याचा प्रयत्न आहे. मनोधैर्य योजनेअंतर्गत तीन लाख रुपयांचा लाभ पीडित मुलीला तत्काळ मिळवून दिला आहे.
प्रदीप पी, जिल्हाधिकारी, नंदुरबार.
सोशल मीडियामुळे वाढतेय विकृती
समाजात सोशल मीडियाचा दुरुपयोग होत आहे. अश्लील चित्रफितीमुळे समाजात विकृती निर्माण होत आहे. याबाबत प्रबोधन होणे गरजेचे आहे. गुन्हे दाखल करण्यास विलंब झाल्यास नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत घ्यावी.
महेश घुर्ये, पोलिस अधीक्षक