आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा भरते वर्षातून दोनच दिवस; विद्यार्थी मध्य प्रदेशचे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नंदुरबार - शाळा आहेत; पण खडू, फळा, पुस्तके आणि वह्याही नाहीत. शिक्षक आहेत पण विद्यार्थी नाहीत. शिक्षण क्षेत्रातले विदारक चित्र आहे. 15 ऑगस्ट व 26 जानेवारी वगळता वर्षातील उरलेले 363 दिवस बंदच राहणारी ही शाळा आहे नंदुरबार जिल्ह्यातील. तपासणीसाठी अधिकारी आले तेव्हा चक्क मध्य प्रदेशातील विद्यार्थी आणून बसवण्याची शिक्षकांची बनवेगिरी मुख्य कार्यकारी अधिकारी रामकृष्ण गमे यांनीच चव्हाट्यावर आणली.
तोरणमाळ या थंड हवेच्या ठिकाणापासून सहा कि.मी.वर असलेल्या सावर्‍या लेकडा येथील जि.प. शाळेतील ही कहाणी आहे. जिल्ह्यातील बिजरी व गोरांबा गावातही हीच परिस्थिती आहे. लेंगापाणी, मानसिंग पाडा येथील शाळांची शैक्षणिक गुणवत्ता अनुक्रमे शून्य व 12.5 टक्के असतानाही तपासणी अधिकार्‍यांनी शंभर टक्के दाखवली. जिल्ह्यात 77 शाळांतील 225 शिक्षकांच्या बाबतीत तक्रारी आल्या होत्या. त्यांना नोटिसा बजावण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.

वर्षातील 363 दिवस या शाळा बंद असतात केवळ 15 ऑगस्ट व 26 जानेवारी दोनच तारखांना ध्वजवंदनासाठी त्या उघडतात, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रामकृष्ण गमे यांनी शिक्षण विभागाच्या गुणवत्ता विकास कार्यशाळेत शनिवारी दिली. कार्यशाळेला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष भरत गावित, शिक्षण समितीचे सभापती नटवर पाडवी, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी बी.मोहन, उपमुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, उपसंचालक भगवान सूर्यवंशी, प्राथमिक शिक्षणाधिकारी एस.पी.जायस्वाल, डॉ. राहुल चौधरी, निरंतर शिक्षणाधिकारी श्रीमती भावना राजनोर, विभागीय व्यवसाय मार्गदर्शन अधिकारी पुष्पावती एम.पाटील, नाशिक येथील श्रीमती सरोज जगताप, गटशिक्षणाधिकारी उमेश डोंगरे उपस्थित होते.

शिक्षक-मुले अनोळखी, नावेच माहिती नव्हती
तपासणीसाठी अधिकारी येणार असल्याचे कळताच शिक्षकांनी मध्य प्रदेशातील विद्यार्थी आणून बसवले. विद्यार्थ्यांना शिक्षकांची, तर शिक्षकांना विद्यार्थ्यांची नावे माहीत नाहीत. विद्यार्थ्यांनी सांगितलेली नावे हजेरीपटावर नाहीत. या गोष्टींमुळे अधिकार्‍यांनी शिक्षकांची बनावटगिरी उघडकीस आणली.

77 शाळांची तपासणी : 10 जुलै रोजी नंदुरबार जिल्ह्यातील 77 जिल्हा परिषद शाळांवर अचानक शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांनी भेटी देऊन तपासणी केली. यात नंदुरबार जिल्ह्यातील अतिशय दुर्गम भागात असलेल्या सावर्‍या लेकडा, बिजरी, गोरांबासह पाच शाळांची विदारक परिस्थिती समोर आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामकृष्ण गमे यांनी सांगितले.


निलंबन नव्हे; शिक्षा द्या
आदिवासींच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी शासनाचे प्रयत्न असताना हा प्रकार होणे दु:खद आहे. शिक्षकांचे निलंबन केले तर त्यांचा पगार सुरूच असतो. त्यापेक्षा वेगळी शिक्षा या शिक्षकांना दिली पाहिजे.
- भरत गावित, जि.प.अध्यक्ष, नंदुरबार

धुळ्यातही धूळफेक
दुर्गम जिल्ह्यातील हे वास्तव असले तरी शेजारच्या धुळे जिल्ह्यातही वेगळी परिस्थिती नही. गत पटपडताळणीत नसलेली मुले हजेरीपटावर दाखवून शिक्षक, अधिकार्‍यांनी संगनमताने शासनाच्या डोळयात धूळफेक केल्याचे उघड झाले होते. हा प्रकार अनेक ठिकाणी सुरू आहे.