आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना जळगाव भेटीचे आमंत्रण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- केळी आणि कापसावरील प्रक्रिया उद्योगासाठी कधी राष्ट्रवादीचे प्रमुख तथा कृषिमंत्री शरद पवारांपासून ते कॉँग्रेसच्या केंद्रीय मंत्र्यांकडे आग्रह धरणार्‍या खासदार हरिभाऊ जावळे यांनी मंगळवारी भाजपच्या पाच खासदारांसह गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. जळगावमधील कृषी मेळाव्यासाठी येण्याचे आमंत्रण दिल्याचे त्यांनी भ्रमणध्वनीवरुन ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

रावेर लोकसभा क्षेत्राचे हरिभाऊ जावळे, जळगावचे ए.टी.पाटील, धुळ्याचे प्रताप सोनवणे, जालना लोकसभेचे रावसाहेब दानवे यांनी सुरतमधील भाजप खासदार सी.आर.पाटील यांच्यासह मंगळवारी अहमदाबादमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री तथा लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचार मोहिमेचे प्रमुख नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने खान्देशमधील राजकारणासाठी ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. मोदींसोबतच्या भेटीत खासदार जावळे यांनी प्रस्तावित मेगा रिचार्ज प्रोजेक्टवर चर्चा केली. केळी आणि कापूस उत्पादक परिसर असला तरी प्रक्रिया उद्योग नसल्याने शेतकर्‍यांना र्शमाचे मोल मिळत नसल्यावर चर्चा झाली.

शेती, सिंचन, उद्योगावर चर्चा
पक्षाच्या प्रचार समितीचे प्रमुख तथा मुख्यमंत्री नरेंद्र मोदींची आम्ही भेट घेतली. या वेळी प्रामुख्याने शेती, सिंचन आणि शेतीपूरक उद्योगांविषयी चर्चा झाली. मोदींना जळगावमधील कृषी मेळाव्यासाठी येण्याचे आमंत्रण दिले. त्यांनी मेळाव्याला उपस्थित राहण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला.
-हरिभाऊ जावळे, खासदार, रावेर

भाजपकडून कृषी मेळाव्याची तयारी
सुपीक जमीन, तापी, गिरणेचे पाणी उपलब्ध असल्याने जिल्ह्यात केळी आणि कापसाचे चांगले उत्पन्न मिळते. केळी, कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे राहिल्यास शेतकर्‍यांचा फायदा होईल. मात्र, केंद्र आणि राज्य सरकार मदत करत नाही. गुजरातमधील उद्योजकांनी यासाठी पुढे यावे, असे साकडे जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी मुख्यमंत्री मोदींना घातले. एवढेच नव्हे तर जळगावमध्ये नियोजित कृषी मेळाव्यासाठी येण्याचे आमंत्रण दिले.