आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नर्मदेचे पाणी शेतकऱ्यांसाठी की उद्योगांसाठी? दिग्विजय सिंह यांनी उपस्थित केला प्रश्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार- नर्मदा नदीवर बांधण्यात आलेल्या सरदार सरोवर प्रकल्पाचे पाणी सर्वांना मिळावे यासाठी अजूनही केंद्र शासनाने पुरेसे कालवे बांधलेले नाहीत. या धरणातील पाण्याचा शंभर टक्के उपयाेग गुजरातला करता येत नसल्याचे चित्र आहे. नर्मदेचे पाणी शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आहे की उद्योगपतींसाठी असा प्रश्न मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी उपस्थित केला. 


माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह नर्मदा परिक्रमा करत आहेत. त्यानुसार ते सोमवारी अक्कलकुवा तालुक्यातील कुकडीपादर येथून गुजरातकडे रवाना झाले. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार अॅड. के.सी. पाडवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दिग्विजय सिंह म्हणाले, वीस वर्षांपूर्वीच नर्मदा परिक्रमा करण्याचा संकल्प केला होता. एकेदिवशी नर्मदा माता माझ्या स्वप्नात आल्याचा भास झाला. परिक्रमा हा शब्द कानी पडला. तेव्हापासून नर्मदा परिक्रमा करण्याचा विचार मनात होता. अखेर ती मनोकामना २० वर्षांनंतर पूर्ण होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात राहिलो. रोज पंधरा किलाेमीटर पायी प्रवास केला. या प्रवासात आदिवासी संस्कृतीचा अभ्यास करता आला. जंगलाच्या रक्षणाची जबाबदारी आदिवासींवर सोपवली पाहिजे. नर्मदा नदीवर गुजरात राज्यात बांधण्यात आलेल्या सरदार सरोवर धरणामुळे अनेक आदिवासी विस्थापित झाले. आदिवासींचे पुनर्वसन करण्याच्या कामात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. नर्मदा नदीमुळे विस्थापित झालेल्यांना न्याय मिळावा यासाठी मेधा पाटकर यांनीही आंदोलन केले, असेही त्यांनी सांगितले. 


नऊशे किलोमीटर प्रवास 
दिग्विजयसिंह यांनी मध्य प्रदेशातील बरमानघाट येथून नर्मदा परिक्रमा सुरू केली आहे. त्यांनी आतापर्यंत ९०० किलोमीटर प्रवास केला आहे. त्यांच्यासोबत पत्नी अमृता सिंह ही आहे. ते रोज पंधरा किलोमीटर पायी प्रवास करतात. दिग्विजयसिंह तीन हजार ८४० किलोमीटर प्रवास करणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...