जळगाव- राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने दिलेल्या प्रस्तावानुसार राज्य शासनाने रक्त व रक्त घटकांच्या पुरवठय़ासाठी आकारण्यात येणार्या शुल्कात दुपटीपेक्षा जास्त वाढ केली आहे. त्यामुळे जळगावात 1 जून रोजी 150 रुपये वाढीचा सामना करणार्या सर्वसामान्य जनतेला आगामी काळात रक्ताच्या दरवाढीला आणखी तोंड द्यावे लागणार आहे. शासकीय रक्तपेढय़ांमध्ये घेण्यात येणार्या शुल्काच्या बरोबरीने खासगी रक्तपेढय़ाही वाढ करण्याचे संकेत मिळू लागले आहेत. राष्ट्रीय रक्त धोरणाची अंमलबजावणी योग्यरीत्या होण्याकरिता राज्यातील धर्मदाय संस्था संचलित व खासगी रक्तपेढय़ांमार्फत रक्त व रक्त घटकांच्या पुरवठय़ासाठीचे सेवाशुल्क निश्चित करण्यात आले होते; परंतु रक्तपेढय़ांमध्ये रक्ताच्या चाचणीसाठी लागणारे केमिकल व तंत्रज्ञानात दुपटीने वाढ झाली आहे. त्यातच कर्मचार्यांच्या पगारातही वाढ करावी लागल्यामुळे रक्तपेढय़ांचा खर्च वाढला आहे. परिणामी, जळगावात आठ वर्षांपासून एकाच दरात मिळणार्या रक्ताच्या पिशव्या 1 जूनपासून दीडशे रुपयांच्या वाढीने मिळत होत्या. त्यातच शासनाने आता शासकीय रक्तपेढय़ांमध्ये 1,050 व अशासकीय रक्तपेढय़ांमध्ये 1,450 रुपये आकारण्याचे निर्देश दिले आहेत.
गेल्या सात वर्षांत दर वाढवले नव्हते; परंतु रक्त चाचणीसाठी लागणार्या साहित्याचे दर दुपटीने वाढले आहेत. त्यातच वीजपुरवठा खंडित झाल्यास जनरेटर लावावे लागते. त्यासाठी डिझेलचा खर्चही दुप्पट झाला आहे. तसेच कर्मचार्यांचे पगार व इतर खर्च लक्षात घेता 1 जूनपासून दरवाढ केली असली तरी, ती अत्यंत कमी आहे.- भानुदास येवलेकर, व्यवस्थापक, गोळवलकर रक्तपेढी
शास्त्रीयदृष्ट्या अधिकाधिक सुरक्षित व निर्जंतुक रक्तपुरवठा करण्यासाठी महागडे केमिकल व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा लागत असल्यामुळे सद्य:स्थितीत असलेल्या सेवाशुल्कात वाढ करणे अपरिहार्य आहे. शासनाने 1450 रुपयांची परवानगी दिली असली तरी, सामान्य जनतेच्या हितासाठी सेवाशुल्कात कमीत कमी वाढ होईल. - डॉ.प्रसन्नकुमार रेदासणी, चेअरमन, रेडक्रॉस रक्तपेढी
सुधारित सेवाशुल्काचा प्रस्ताव मंजूर
रेडक्रॉस व गोळवलकर रक्तपेढीने 1 जून रोजी सेवाशुल्कात वाढ केली होती. पूर्वीच्या दरात 150 रुपये एवढी ही वाढ होती. सध्या संपूर्ण रक्तासाठी व पीसीव्हीसाठी 850 रुपये मोजावे लागत आहेत. त्यातही पुरुष रक्तदाता प्राधान्य कार्ड असल्यास रेडक्रॉसमध्ये 300 व गोळवलकर रक्तपेढीत 200 रुपयांची सूट मिळते. आता शासनाने नवीन दर लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे रेडक्रॉसने शासकीय रुग्णालयातील नवीन दराच्या जवळपास वाढीचे संकेत दिले आहेत.सेवाशुल्कात सुधारणा करण्यासाठी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्या अनुषंगाने राज्य रक्त संक्रमण परिषदेतर्फे त्यात सुधारणेसाठी समितीही गठित केली होती. या समितीने परिषदेला सुधारित सेवाशुल्काचा प्रस्ताव पाठवला होता. त्यास मंजुरी दिली.