आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National Coach Of Roll Ball Nandu Patil Earn Through Labour Work

करतो हमाली... तरीही रोलबॉलचा राष्ट्रीय पंच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: नंदू पाटील
नंदुरबार - मित्रांसोबत जाऊन स्केटिंग शिकणाऱ्या शहरातील युवकाने रोलबॉल स्पर्धेत केवळ सुवर्णपदकच मिळवले नाही तर राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेत कोच पंचाचीही भूमिका बजावली आहे. सुरत येथे होणाऱ्या आगामी रोलबॉल स्पर्धेत त्याच्यावर पुन्हा कोचची जबाबदारी टाकण्यात आली आहे. नंदुरबार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पोटासाठी हमालीचे काम करणारा नंदू पाटील हा युवक बाहेरच्या राज्यात कोच पंचाची जबाबदारीही स्वीकारतो. जेव्हा त्याला पंच म्हणून बोलावले जाते तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा असतो.

नंदू पाटील याने दहावीपर्यंत शिक्षण घेतले. दहावीत तो नापास झाल्यानंतर त्याने हमाली सुरू केली. अशातच तो क्रिकेट खेळू लागला. नंतर स्केटींगमध्ये मन रमल्याने मित्रांसोबत तो स्केटिंगच्या सरावालाही जाऊ लागला. हळूहळू त्याला स्केटिंग जमू लागले. २१ वर्षांचा असताना सन २००६मध्ये जळगावला रोलबॉल स्पर्धा झाली. या स्पर्धेत टीमला घेऊन जाण्याची जबाबदारी नंदूवर सोपवण्यात आली. यातून नंदूच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले. सन २००९मध्ये नाशिक येथे रोलबॉलची राज्यस्तरीय स्पर्धा पार पडली. त्यानंतर जळगावला राष्ट्रीय स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने सुवर्णपदक पटकावले.

अस्सल भारतीय खेळ
बर्फावरकिंवा जमिनीवर स्केटिंग करणाऱ्या खेळाडूंना पाहताना प्रेक्षकांना वेगळीच अनुभूती मिळते. स्केटिंग करीत जर हॉकी किंवा हॅण्डबॉलसारखी चेंडूफेक केली तर खेळणाऱ्या आणि पाहणाऱ्यांनाही वेगळाच आनंद मिळतो. नेमकी हीच संकल्पना मनाशी बाळगून राजू दाभाडे या पुण्याच्या माजी राष्ट्रीय खेळाडूने तेरा वर्षांपूर्वी रोलबॉल या खेळाची मुहूर्तमेढ रोवली. हा क्रीडा प्रकार आज जगभरात ३५ देशांत खेळला जातो. ज्या दिवशी हा खेळ ५० देशात खेळला जाईल तेव्हा हा खेळ ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट होईल. या खेळाची दखल महानायक अमिताभ बच्चन यांनीही एका कार्यक्रमातून घेतली. राजू दाभाडे हे नंदूशी परिचित आहेत. अनेकदा त्यांचे बोलणे होते. त्यांच्याकडून त्याने या खेळाचे धडे घेतले आहेत.

सार्थ अभिमान
मी हमाली करतो. हमालांना फारशी किंमत नसते. माझे शिक्षण दहावी नापास. सन्मान मिळण्याची गोष्ट ही मला स्वप्नवत वाटत होती. पण माझ्या आयुष्यात मी खूप काही मिळवले याचे समाधान आहे. कुठलेही काम करताना झोकून दिल्यास शिक्षणाच्या कागदी पदव्या तोकड्या ठरतात. माझ्यावर रोलबॉलचे जनक राजू दाभाडे यांचा आशीर्वाद आहे. ते माझ्यावर खूप मोठी जबाबदारी टाकतात. याचा मला सार्थ अभिमान आहे. यापुढेही खेळाचे काम अविरत ठेवणार आहे. नंदू पाटील, रोलबॉल खेळाडू, नंदुरबार