आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाट्यप्रेमींना वेध: बंदिस्त नाट्यगृहाचा पडदा उठणार तीन वर्षांनी!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरातील नव्याने बांधण्यात येणार्‍या बंदिस्त नाट्यगृहाच्या निर्मितीसाठी हालचाली सुरू झाल्या असून, त्यासाठी आणखी तीन वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. अनेक चांगली नाटके केवळ नाट्यगृहाअभावीच शहरात होत नसल्याने या बंदिस्त नाट्यगृहाच्या निर्मितीकडे नाट्यप्रेमींचे लक्ष लागले आहे. मायादेवीनगरात जिल्हा शल्यचिकित्सकांच्या बंगल्यामागे हे बंदिस्त नाट्यगृह उभारण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता टी.जे.पाटील यांनी दिली.

सांस्कृतिक वारसा जोपासलेल्या शहरात खुले बालगंधव नाट्यगृह, तसेच जिल्हा बँकेच्या सभागृहाव्यतिरिक्त दिमाखदार नाट्यगृह नसल्याची खंत वर्षानुवर्षे व्यक्त होत आहे. शहरात चांगले नाट्यगृह निर्माण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करणार्‍या नाट्यप्रेमींचे स्वप्न लवकरच पूर्णत्वास येणार असून मायादेवीनगरात जिल्हा शल्यचिकित्सकांच्या बंगल्यामागे बंदिस्त नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. नाट्यगृहासाठी 6,600 चौरस मीटर जागा निश्चित करण्यात आली असून त्यात 30 बाय 30 मीटरचा हॉल असेल. मुंबई पुण्याच्या धर्तीवर रंगमंच उभारण्यात येणार असून त्यासाठी 13 कोटी 72 लाख रुपयांच्या तरतुदीला मंजुरी मिळाली आहे.

1200 आसनव्यवस्था
अत्यंत प्रशस्त असणार्‍या या बंदिस्त नाट्यगृहात पहिल्या फ्लोअरवर 850 तर बाल्कनीत 350 खुच्र्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. संपूर्ण नाट्यगृह वातानुकूलित राहणार असून रंगमंचावर उच्च प्रतीची प्रकाशयोजना व ध्वनियंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र जबाबदारी निश्चित करण्यात येणार असून नाट्यगृहाच्या उभारणीनंतर या कामांना प्रारंभ होईल. प्रेक्षकांना नाट्यगृहाच्या बाहेर उभे राहण्यासाठी स्वतंत्र गॅलरी राहणार असून खवय्यांसाठी कॅफेची व्यवस्था करण्यात येणार आहे.

तळमजल्यावर तिकीट घर
नाट्यगृहाच्या प्रवेशानंतर तळमजल्यात वाहन पार्किंगची व्यवस्था असेल. फ्लोअरच्या उंचीपर्यंत तिकीट घर बांधण्यात येईल. यासाठी व्हीआयपींसाठी एक सूट तयार करण्यात येणार असून मुंबई-पुण्याच्या नाट्यगृहात असलेल्या सर्व सुविधा दिल्या जातील. संपूर्ण नाट्यगृहाच्या कामासाठी सुमारे 29 कोटी रुपये खर्च येईल, अशी माहिती उपअभियंता पाटील यांनी दिली.