आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीपेठेतून चोरट्यांनी लांबवली तिजोरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-नवीपेठेतील जुन्या भगीरथ शाळे शेजारील प्राइड डिस्ट्रिब्युशन प्रा.लि. हे सौंदर्य प्रसाधने पुरवणार्‍या कंपनीच्या कार्यालयात बुधवारी मध्यरात्री चोरी झाली. यात चोरट्यांनी कार्यालयातील लोखंडी कपाटात ठेवलेली तिजोरी पळवली. तिजोरीत 2 लाख 76 हजार 814 रुपये रोख होते.
प्राइड डिस्ट्रिब्युशन हे पी अँड जी आणि सी अँड एफ या कंपन्यांचे एरियल, टाइड, पॅन्टीन, जीलेट आदी प्रकारची सौंदर्य प्रसादने आणि गृहपयोगी वस्तूंचे उत्पादने होलसेल विक्रेत्यांना वितरित करण्याचे अधिकृत कार्यालय आहे. कार्यालयाला लागून आणि वरच्या मजल्यावर स्टोअर रूम आहे. चोरट्यांनी स्टोअर रूमच्या दरवाजाचे कुलूप तोडून मधल्या एका दरवाजाने कार्यालयात प्रवेश केला. कार्यालयातील लोखंडी कपाटात ठेवलेली तिजोरी त्यांनी पळवली आहे. या तिजोरीत 2 लाख 76 हजार 814 रुपये रोख होते. तिजोरी कपाटात नट-बोल्डच्या साह्याने फीट केली होती. नट-बोल्ट उघडून तिजोरी पळविण्यात आली. याप्रकरणी कंपनीचे स्थानिक व्यवस्थापक कल्पेश येवले यांच्या फिर्यादीवरून शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक बी.ओ.सोनवणे तपास करीत आहेत.
कर्मचार्‍यांची चौकशी :
स्टोअर रूममधून एक दरवाजा कार्यालयात जातो. कार्यालयातील कपाटातून तिजोरीच गायब होते. या संशयावरून पोलिसांनी 37 कर्मचारी आणि 5 वाहनचालकांची चौकशी केली. तसेच त्यांच्या हाताचे ठसे घेतले आहे. त्यांनतर चौकशी करुन त्यांना सोडून देण्यात आले. गेल्या काही महिन्यांत येथील दोन कर्मचार्‍यांनी विक्रीच्या काही वस्तू आणि मोबाइल चोरी केल्याच्या घटना घडल्या होत्या. या कर्मचार्‍यांना व्यवस्थापकाने कामावरून काढून टाकले होते. त्यांचीही चौकशी करण्यात आली आहे.