जळगाव- राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील संघटन आणि येथील पक्षाच्या पुढार्यांसंदर्भात शरद पवार, अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी तर जोरदार टीका करत पक्षाच्या स्थानिक नेत्यांचे कान उपटले होते. मुंबईतील बैठकीत खुद्द पवारांनी पक्ष संघटन आणि अस्तित्वासाठी एकत्र येण्याची तंबी दिली आहे. मात्र, तरीदेखील जिल्ह्यातील शिलेदार एकत्र येण्याचा योग नाही. मंगळवारी होणार्या वर्धापनदिनालादेखील केवळ औपचारीक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वत: पुरता पक्षाचा वापर करीत असल्याने जळगावमध्ये पक्ष खासगी प्रॉपर्टीसारखा झाल्याची खंत काही कार्यकर्त्यांनी मुंबईतील बैठकीत व्यक्त केली होती. पक्ष नेतृत्वानेदेखील ही गोष्ट अधोरेखीत करत पक्षाचे अस्तित्व राखण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. प्रदेशाध्यक्षांनी तर नेत्यांच्या वागण्याचे वाभाडे काढून थेट कारवाईची तंबीच दिली होती. एकत्र येऊन काम करा ही पक्षनेतृत्वाची अपेक्षा पूर्ण करण्याची संधी म्हणून मंगळवारी पक्षाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधले जाऊ शकते, अशीही अपेक्षा संघटनेला होती. मात्र, जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी पुन्हा एकत्र येण्याची शक्यताही मावळली आहे. जिल्हा संघटनेतर्फे वर्धापनदिनानिमित्त सर्वच औपचारीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोणत्या कार्यक्रमांचे आयोजन करायचे याबाबत एकत्र विचार विनिमयदेखील झालेला नाही.