आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीला संपविणारेच संपतील - सुनील पाटील

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावेर - व्यक्तिपेक्षा पक्ष मोठा आहे. पक्ष संपविण्याची भाषा करणारे संपतील. आगामी काळात यश मिळवायचे असेल तर सर्वांनी गट-तट विसरून कामाला लागावे, असे आवाहन करत बंडखोरीची भाषा करणा-यांविरूद्ध कोणतीही सहानुभूती राहणार नसल्याचे संकेत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांनी केले. तालुका राष्ट्रवादीत उमेदवारीवरून गटबाजीला उधान आल्याने सोमवारी त्यांनी रावेरमध्ये बैठक घेतली.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावेर राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली आहे. रविवारी राष्ट्रवादी किसान भारतीचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, माजी तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी नाराजीचा सूर लावला. संभाव्य बंडाळीची धास्ती बसल्याने जिल्हापदाधिका-यांनी रावेरमध्ये बैठक घेतली.
रावेरमधील पक्ष कार्यालयाच्या गच्चीवर सोमवारी राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, उपाध्यक्ष रमेश पाटील, जिल्हा समन्वयक विलास पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. माजी आमदार अरूण पाटील, सावदा येथील राजेश वानखेडे, प्रकाश पाटील, वाय. व्ही. पाटील, देवानंद पाटील, जलाल शेख, जितू पाटील, लक्ष्मण मोपारी, डॉ. सुभाष पाटील, संजय पाटील, राजेंद्र चौधरी, किशोर पाटील, दिलीप साबळे, सोपान पाटील, मधुकर पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.
सोपान पाटील हिरमुसले - सोमवारी झालेल्या बैठकीला किसान भारतीचे जिल्हाध्यक्ष तथा बंडाचा झेंडा फडकविणारे सोपान पाटील उपस्थितीत होते. इतरांप्रमाणे ते सुद्धा बैठकीत मत मांडण्यासाठी इच्छुक होते. मात्र, ते बोलण्यापूर्वीच जळगाव आलेल्या पदाधिका-यांनी जेवणासाठी केºहाळ््याकडे प्रयाण केले. यामुळे पाटील यांना इच्छा असूनही त्यांच्या भावना व्यक्त करता आल्या नाहीत, याची नाराजी त्यांच्या चेह-यावर स्पष्टपणे दिसत होती.
अद्याप कुणालाही उमेदवारी नाही - निवडणुकीत चांगले यश आणि सत्ता मिळवायची असेल तर सर्वांनी गट-तट, आपसातील हेव्यादाव्यांना बाजूला ठेवणे आवश्यक आहे. पक्षाकडून अद्याप कुणाचीही उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे कुणाच्या नाराजीचा विषय नाही. इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या सर्व इच्छुकांनी एकत्र येवून आपल्यातील एक उमेदवार निवडावा, तोच उमेदवार पक्षाकडून जाहीर होईल. कॉंग्रेससोबत अजूनही आघाडीच्या वाटाघाटी सुरू आहेत. त्यामुळे उमेदवार जाहीर करण्याचा विषयच नाही. राष्ट्रवादीकडून 18 जागांसाठी पक्षाकडून 70 जण इच्छूक आहेत. पक्षहिताच्यादृष्टीने जिंकून येण्याची क्षमता असलेले उमेदवार देऊ. - विलास पाटील, जिल्हा समन्वयक
नाराजीचे कारण काय? - तालुक्यातील ऐनपूर-खिरवड गट सर्वसाधारण झाला आहे. या गटातील नेहेता हे सोपान पाटील यांचे गाव आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या उमेदवारीसाठी याच गटातून उमेदवारीसाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीकडून मात्र रमेश नागराज पाटील यांचे नाव पुढे येत आहे. हेच नाराजीचे मुख्य कारण असल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात आहे. सोपान पाटील यांनी तालुक्यात पक्षवाढीसाठी मेहनत घेतली असली तरी पक्षानेही त्यांना भरभरून दिले आहे, असे एका गटाचे म्हणने आहे.
राष्ट्रवादीकडून न्यायाची अपेक्षा नाही - राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून न्यायाची अपेक्षा नाही. जिल्ह्यावरून आलेले सुनील पाटील यांनी रावेरमधून राष्ट्रवादी संपविण्याची सुपारी घेतली आहे. सहा महिन्यांपासून ते बसपा नेत्याच्या प्रवेशासाठी प्रयत्नशील असल्याने पक्षात अस्वस्थता आहे.सुनील पाटील, विकास पाटील यांनी काय केले आहे, ते जिल्ह्याला माहिती आहे. कारण त्यांच्याविरूद्ध पक्षात आधीच तक्रारींचा पाऊस आहे. - सोपान पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस किसान भारती
पालकमंत्र्यांच्या सूचना - पक्षापेक्षा, पक्षाने घेतलेल्या निर्णयापेक्षा कोणीही मोठे नाही. पक्ष ज्यांना उमेदवारी देईल, त्यांच्यासोबत काम करण्याची सर्वच पदाधिका-यांची जबाबदारी आहे. काही नवीन उमेदवार इच्छुक असून ते पक्षाध्यक्ष शरद पवार यांना श्रद्धास्थान मानतात. त्यांना कामाला लागण्याबाबत पालकमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत. मेरिटनुसार उमेदवारी देवू, कार्यकर्त्यांनी संभ्रमित होवू नये. - गोपाळ पाटील, युवक तालुकाध्यक्ष
राष्ट्रवादीला पोषक वातावरण - राष्ट्रवादीचे लोण ग्रामीण भागातही पोहचले आहे. पूर्वी फक्त शहरात राष्ट्रवादीचा जोर दिसायचा. आता ग्रामीण भागात शेतक-यांपासून ते मजुरापर्यंत सर्वांना राष्ट्रवादी कॉँग्रेस हवी आहे. राज्यातील आघाडी सरकार व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महाराष्ट्राला विकासाची दिशा दिली. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पक्षाला पोषक वातावरण आहे. - अरूण पाटील, माजी आमदार
चांगले उमेदवार द्यावेत - पक्षाच्या वाढीसाठी ज्यांनी कष्ट केले आहेत, त्यांना पक्षाने संधी दिली पाहिजे. आता पक्ष काय निर्णय घेतो याची वाट पाहत आहे. चांगले उमेदवार दिल्यास चांगले परिणाम होतील, एवढेच नव्हे, तर जनतेमध्ये सुद्धा चांगला संदेश जाईल. पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जाणीवपूर्वक गैरसमज पसरविले जात आहेत. याची शहानिशा होणे अतिशय गरजेचे आहे. - रवींद्र चौधरी,सरचिटणीस