आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘राष्ट्रवादी’चा नाटकी चेहरा झाला उघड!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-व्यक्तीच्या काळानुरूप बदलणार्‍या भूमिका आणि राजकीय नाटकांचा एक अंक शनिवारी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात पार पडला. दीड वर्षापूर्वी खासदार ईश्वरलाल जैन यांची पक्षातून हकालपट्टी करावी म्हणून आयोजित विशेष बैठकीत जिवाचा आकांत करून शिव्याशाप देणार्‍या जामनेरचे तालुकाध्यक्ष शरद पाटील यांनी शनिवारी आयोजित बैठकीत जैन यांची तोंडभरून स्तुती केली. इतर पदाधिकार्‍यांनीही राजकीय नाट्याचा हाच कित्ता गिरविला. या घटनांमधील नाटकीपणाचे साक्षीदार असलेल्या कार्यकर्त्यांची शनिवारी चांगलीच गोची झाली.
जिल्हा बॅँकेतील पराभवास जबाबदार धरून खासदार जैन यांना पक्षातून काढून टाकण्यासाठी 5 ऑक्टोबर 2012 रोजी पक्षाची विशेष बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी जैन यांनी तत्काळ राजीनामा देण्याची मागणी जामनेरच्या तालुकाध्यक्षांनी केली होती. शनिवारी मात्र त्यांनी खासदार जैन हे माझे नेते असल्याचे सांगत त्यांची तोंडभरून स्तुती केली. 7 ऑक्टोबर 2012 रोजी खासदार जैन यांनी पक्षाची पायरी चढू नये म्हणून शर्तीने प्रयत्न करणारे जिल्हाध्यक्ष गफफार मलिक आजच्या बैठकीत त्यांच्या शब्दाच्या बाहेर नव्हते. उपस्थित इतर पदाधिकार्‍यांनीही हाच कित्ता गिरविला.
आधी नेत्यांमध्ये घडवा समन्वय
पक्षातील कार्यकर्ते त्यांच्या जागेवर कायम आहेत. नेते मात्र आपसात भांडत आहेत. पक्षाची ताकत असली तरी आधी तुमच्यातच समन्वय घडवून आणा नंतर काय ते बघू! अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी पक्षाच्या पदाधिकार्‍यांना खडे बोल सुनावले. पक्षाच्या सदस्यालाच उमेदवारी देण्याचा ठरावही यावेळी करण्यात आला. गफफार मलिक यांना विधान परिषदेवर घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
पालकमंत्र्यांवर शरसंधान
बैठकीला पालकमंत्री उपस्थित नव्हते. ते पक्षातील कोणत्याच कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहत नाहीत, फोन उचलत नाहीत. कोठे आले तर कार्यकर्त्यांना भेटत नाहीत, पक्षाचे मंत्री असूनही आमचा उपयोग होत नसल्याची तक्रार यावेळी कार्यकर्त्यांनी केली. त्यांनी बैठकांना तरी यावे अशी अपेक्षा काहींनी व्यक्त केली.
यांची उपस्थिती :
आमदार साहेबराव पाटील, दिलीप वाघ, गफ्फार मलिक, मनोज चौधरी, दिलीप सोनवणे, अनिल चौधरी, तिलोत्तमा पाटील, मंगला पाटील, मंगला शिंदे, कल्पना पाटील, रमेश पाटील, विनोद तराळ, प्रतिभा शिरसाठ, मीनल पाटील, कल्पिता पाटील.
गुन्हे दाखल करण्यासाठी एकनाथ खडसे देतात पैसे
एकनाथ खडसे हे पैसे देऊन गुन्हे दाखल करतात. मला आणि माझ्या मुलाला ते दररोज जेलमध्ये टाकण्याच्या गोष्टी करतात; पण आम्ही घाबरत नाही. खोट्या आरोपांना भीक घालणार नाही. पक्षांतर्गत भांडणे आम्ही निवडणुकीनंतर निपटू; पण आता भाजपातील शत्रूंचा बंदोबस्त करायचा आहे. ईश्वरलाल जैन, खासदार