आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्वानांच्या निर्बीजीकरणात होतेय बेफिकिरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मोकाट कुत्र्यांचा उपद्रव कमी व्हावा, यासाठी त्यांच्या निर्बीजीकरणासाठी महापालिकेतर्फे औरंगाबाद येथील राही फाउंडेशनला मक्ता देण्यात आला आहे. तातडीने हे काम पूर्ण करण्याच्या प्रयत्नात मक्तेदाराकडून कुत्र्यांवरील शस्त्रक्रियेनंतर जखम बरी न होताच कुत्रे गावात सोडून देण्यात येत आहेत, ज्यामुळे जखमा चिघळून कुत्रे पिसाळण्याची शक्यता आहे. मक्तेदाराने चार दिवसांत शस्त्रक्रियेनंतर दोनशे कुत्रे अशाच प्रकारे शहरात सोडून दिले आहेत, ज्यांच्या जखमा अद्याप ओल्या आहेत.

मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले होते. पिंप्राळा, मेहरूण, एमआयडीसीसह मध्यवर्ती भागातही बालकांना चावे घेण्याच्या घटना मोठय़ा प्रमाणावर वाढल्या होत्या. या प्रकरणी ‘दिव्य मराठी’ने वृत्तमालिका सुरू करीत मोकाट कुत्र्यांच्या गंभीर समस्येवर प्रकाशझोत टाकला होता. अखेर अनेक वर्षांपासून रखडलेल्या श्वान निर्बीजीकरणाचा विषय गांभीर्याने घेत महापालिकेतर्फे औरंगाबाद येथील राही फाउंडेशनला या कामाचा मक्ता दिला आहे.

मक्तेदाराची बेफिकिरी

मक्तेदाराकडून 16 जानेवारीपासून श्वान निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. शहरातील ममुराबाद शिवारातील बंद पडलेल्या खत कारखान्याची जागा यासाठी मक्तेदारास देण्यात आली आहे. या ठिकाणी तीन पशुवैद्यकीय डॉक्टर व दहा कर्मचार्‍यांच्या माध्यमातून शहरातून पकडून आणलेल्या कुत्र्यांवर निर्बीजीकरणाच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. चार दिवसांत अशा प्रकारे 210 कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करून त्यांना सोडून देण्यात आले आहे. नियमानुसार शस्त्रक्रियेनंतर किमान तीन ते पाच दिवस कुत्र्यांवर औषधोपचार करणे गरजेचे असते. मात्र, तसे न करताच कुत्रे सोडून देण्यात आल्याने ओल्या जखमांमुळे कुत्रे पिसाळण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

या अटींचे होत आहे उल्लंघन

कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी मक्ता देताना महापालिका आणि मक्तेदारामध्ये झालेल्या करारात सर्वसाधारण अटींमध्ये 11 मुद्द्यांचा समावेश आहे. यातील अट क्रमांक 4 नुसार प्रजनन शस्त्रक्रिया करणे, श्वानदंश लस देणे, शस्त्रक्रिया केलेल्या कुत्र्यांवर ते पूर्ण बरे होईपर्यंत औषधोपचार करणे, शस्त्रक्रिया केल्याचे ओळखचिन्ह करणे व त्यांची खानपान व्यवस्था करण्याचे नमूद करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मक्तेदाराकडून या अटींचा भंग होत आहे.

अशी होते शस्त्रक्रिया

पकडण्यात आलेल्या कुत्र्यांचे वजन केले जाते. वजनानुसार त्यांचा केसपेपर तयार करून भूल देण्यात येते. जेथे शस्त्रक्रिया केली जाते तो शरीराचा भाग निर्जंतुकीकरण केला जातो. निर्जंतुकीकरणानंतर रेबिज प्रतिबंधक इंजेक्शन दिल्यावर मादी असल्यास तिचे गर्भाशय काढून टाकले जाते, तर नर कुत्र्याचे अंडाशय काढून टाकले जाते. एक ते दोन इंच लांबीची ही शस्त्रक्रिया झाल्यावर टाके घालण्यात येतात.

शस्त्रक्रियेनंतर ओळखचिन्हे

शहरातील कुठल्या भागातून कुत्रा पकडून आणला आहे, याची नोंद रजिस्टरमध्ये केली जाते. पकडून आणलेल्या कुत्र्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याची ओळख पटावी म्हणून त्याच्या डाव्या कानाला इंग्रजी ‘व्ही’ आकारात कापले जाते. पकडताना घेतलेल्या नोंदीनुसार संबंधित कुत्र्यांना पुन्हा त्याच भागात सोडून दिले जाते.