आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुशखबर! राजधानीसाठी नवीन ‘एसी’ अतिजलद साप्ताहिक गाडी लवकरच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- केळी-कापसामुळे खान्देश, विदर्भ आणि मध्य प्रदेशातील बर्‍हाणपूरचा दिल्लीतील व्यापार उदीम वाढला आहे. मात्र, विभागातून रेल्वेने दिल्लीला जाण्यासाठी भुसावळ हा एकमेव पर्याय आहे. औरंगाबादच्या प्रवाशांना मनमाड गाठावे लागते.

भुसावळला थांबा घेवून दिल्लीकडे जाणार्‍या गाड्यांना आरक्षित तिकिटांचा कमी कोटा असल्याने प्रवाशांची धावपळ होते. यामुळे ‘इर्मजन्सी कोटा’ वाढवून देण्यासह भुसावळ विभागातून मुंबई ते नवी दिल्लीदरम्यान ‘राजधानी’सारखी स्वतंत्र गाडी सुरू करा, अशी मागणी खासदार हरिभाऊ जावळे यांनी केली होती. जानेवारी 2013 मध्ये त्यांनी यासंदर्भात तत्कालिन रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांची भेट घेवून निवेदन दिले होते.

या पार्श्वभूमीवर आठवड्यातून एक दिवस चालणारी लोकमान्य टिळक टर्मिनन्स ते हजरत निजामुद्दीन (गाडी क्रमांक 22109/22110) ही गाडी लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. यामुळे नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, बर्‍हाणपूर येथून दिल्लीकडे जाणार्‍या प्रवाशांना दिलासा मिळू शकतो. नियोजित वेळापत्रकानुसार ‘एलटीटी’वरून मंगळवारी दुपारी 2.30 वाजता सुटणारी गाडी हजरत निजामुद्दीन स्थानकावर बुधवारी सकाळी 10.20 वाजता पोहोचेल. मात्र, नोटिफिकेशन न निघाल्याने स्थानिक पातळीवर या निर्णयाची माहिती अजून मिळालेली नाही. दरम्यान, दिल्लीसाठी संपूर्ण वातानुकुलित गाडी सुरू झाल्यास जिल्ह्यातील व्यापारी-उद्योजकांनी फायदेशीर ठरेल, असे खान्देश जीनिंग कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी सांगितले.

गाडीची रचना अशी
एलटीटी-हजरत निजामुद्दीन गाडीला फस्र्ट एसी-1, सेकंड एसी-3, थ्री टिअर एसी-10 आणि दोन अतिरिक्त अशा एकूण 16 बोगी राहणार आहेत.

फक्त सहा थांबे
अतिजलद आणि संपूर्ण वातानुकूलित असलेल्या या गाडील दोन्ही बाजूच्या प्रवासात फक्त सहा थांबे असतील, असे सूत्रांनी सांगितले. नाशिकरोड, भुसावळ, भोपाळ, झाशी, ग्वाल्हेर, आग्रा अशी ही स्थानके आहेत. नोटिफिकेशन निघाल्यावर गाडी सुरू होण्याची तारीख जाहीर होईल.

असा होईल फायदा
जळगाव, नंदुरबार, धुळे, अकोला, बुलडाणा येथील प्रवाशांना दिल्लीला जाण्यासाठी भुसावळ स्थानकाचा एकमेव पर्याय आहे. नव्याने सुरू होणारी साप्ताहिक गाडी संपूर्ण वातानुकूलित असेल. यामुळे प्रवाशांना येणार्‍या अडचणी कमी होतील. प्रवासासाठी अजून एक पर्यायी गाडी उपलब्ध होईल. औरंगाबादमधील प्रवाशांना मनमाड स्थानकावरून या गाडीचा लाभ घेता येईल.

प्रवाशांना फायदाच
दिल्लीकडे जाण्यासाठी ‘राजधानी’सारखी नवीन गाडी सुरू करा, यासाठी जानेवारीमध्ये तत्कालीन रेल्वेमंत्र्यांना भेटलो होतो. रेल्वे बोर्ड, रेल्वे सल्लागार समितीला सूचना केली होती. या आनुषंगाने सुरू होणार्‍या संपूर्ण वातानुकूलित गाडीचा प्रवाशांना नक्कीच फायदा होईल. लवकरच पुरी-अजमेर आणि निजामुद्दीन-कुर्ला गाडी सुरू होईल.
-हरिभाऊ जावळे, खासदार, रावेर


दिल्लीतील केळी बाजार सोयीचा
केळीबेल्ट रेल्वेला 12 कोटींचा वार्षिक महसूल देतो. तरीही रावेर स्थानकावर फक्त दादर-अमृतसर ही एक्स्प्रेस थांबते. नव्याने गाडी सुरू झाल्यास व्यापार्‍यांना सकाळी दिल्लीतील बाजारपेठेत कामे उरकता येतील.
-हरीश गनवाणी, केळी व्यापारी, रावेर

उद्योजक-व्यावसायिकांना मदत
दिल्लीकडे जाण्यासाठी पुरेशा गाड्या नाहीत. आहेत, त्यांचे तिकीट वेळेवर मिळत नाही. नव्याने संपूर्ण एसी गाडी सुरू झाल्यास उद्योजक-व्यावसायिकांना मदतच होईल.
-किरण राणे, उपाध्यक्ष, जळगाव इंडस्ट्रीअल असोसिएशन (जिंदा)

सध्या उपलब्ध गाड्या
निजामुद्दीन एक्स्प्रेस (क्रं.12147-बुधवार), सुवर्णजयंती एक्स्प्रेस (क्रं.12781-रविवार), एलटीटी-हरिद्वार एसी सुपर एक्स्प्रेस (क्रं.12171-सोमवार, गुरूवार), मंगला एक्स्प्रेस (क्रं.12617-दररोज), कर्नाटका एक्स्प्रेस (क्रं.12627-दररोज), वास्को-हजरत निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस (क्रं.12779-दररोज), निजामुद्दीन-लिंक एक्स्प्रेस (क्रं.1705-दररोज), नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस (क्रं.12715-दररोज), झेलम एक्स्प्रेस (क्रं.11077-दररोज).