आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहर विकासात अडथळा नकोच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - महापालिकेच्या शाळा आणि इतर वास्तू धूळ खात पडल्या आहेत. त्यांचा काहीच उपयोग होत नाही. त्यांचे नूतनीकरण झाले तर त्यातून काही सुविधा मिळतील. शहराचे रूपही बदलेल. तसेच रस्त्यांवरील अतिक्रमणाची समस्याही सुटेल. योग्यरीत्या पार्किंगची सोय झाली तर वाहतुकीची कोंडीही सुटेल, असा आशावाद नागरिकांमध्ये आहे. त्याबाबत खुल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना आग्रारोडवरील व्यापार्‍यांनीही विकासात कोणी अडथळा आणू नये, असे म्हटले.
शहरात इंग्रजकालीन शाळा, व्यापारी संकुले व इतर इमारती आहेत. मध्यवर्ती भागात मुख्य बाजारपेठ वसली आहे. मात्र, शहराचा विस्तार आणि लोकसंख्या वाढत असताना ही बाजारपेठ कमी पडत आहे. दुसरी बाब म्हणजे रस्त्यावर फेरीवाले वाढले आहेत. दोन, तीन रस्ते अतिक्रमणाखाली गेले आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक व गर्दीही वाढत आहे. त्यातून वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. महापालिकेकडे असणार्‍या शाळा ह्या बहुतांश इंग्रजकालीनच आहे. या शाळांचे बांधकाम दगडी आहे. त्यांना सरासरी शंभर वर्षे पूर्ण झाली असून, काही त्यापेक्षा अधिक जुन्या आहेत. आजची महापालिका आणि तत्कालीन नगरपालिकेचा इतिहास दीडशे वर्षांपूर्वीचा आहे.
शाळेप्रमाणेच मुख्य बाजारपेठ असलेल्या पाचकंदील मार्केटलाही शंभर वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र, त्या वेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात मोठी तफावत आहे. पूर्वी सुटसुटीत असणारे मार्केट, रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर गर्दी होत असल्याने काळानुरूप त्यात बदल करणे गरजेचे आहे. त्या जागेवर नवीन वास्तू उभारून त्यांचे विस्तारीकरण करून आधुनिक सुविधा उपलब्ध करून पार्किंग तसेच दोन ते तीन मजली मार्केट उभारून व्यावसायिकांना सामावून घेणे काळाची गरज आहे. अन्यथा केवळ जुन्या वास्तूचे नुसतेच जतन करायचे म्हटल्यास अनेक वास्तू आज केवळ पडून राहतील. त्यातील ठरावीक इमारतींचे जतन करावे. मात्र, शहराच्या विकासाचाही सर्वानुमते विचार व्हावा.

0 दिवसेंदिवस वाढणारे फेरीवाले कमी होतील, अधिकृत फेरीवाले असतील.
0 दुकाने, भाजीपाला, अन्य विस्कळीत गोष्टी एकाच छताखाली येणार.
0 जीर्ण इमारती पाडून विस्तीर्ण, भव्य दुकाने निर्माण होणार.
0 नवीन इमारती, संकुले निर्माण झाल्यास वाहतुकीची कोंडी सुटेल.
0 भाजीवाले, फेरीवाले, विक्रेते तसेच अनेक व्यापारी येतील एका छताखाली.
0 पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर, नवीन संकुलात असेल प्रशस्त पार्किंग.
शहरातील या समस्या सुटण्यास होईल मदत
नवीन बांधकाम व्हावे
- शहरातील पाचकंदील मार्केट हे जुने असले तरी येथे आता खूप गर्दी होत आहे. त्यासाठी नवीन सर्व सोयींयुक्त मार्केटचे निर्माण होणे गरजेचे आहे. त्यातून वाहतुकीची व इतर समस्या सुटण्यास मदत होणार आहे. भिकन बागवान, फळविक्रे ते
अतिक्रमण मोकळे होईल
- शहरातील हे मुख्य मार्केट आहे. त्यामुळे यात काळानुरूप बदल होणे आवश्यक आहे. नवीन मार्केट झाल्यास नागरिकांनाही सुविधा मिळणार आहेत. तसेच सध्या काही प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्याचाही प्रश्न सुटून रस्तेही मोकळे होतील. हमीद बागवान , व्यावसायिक
व्यावसायिकांचे पुनर्वसन व्हावे
- नवीन मार्केट बांधण्याचा निर्णय महापालिका घेत आहे. मात्र, या बांधकामासाठी लागणार्‍या कालावधीदरम्यान येथील व्यावसायिकांचे पुनर्वसन व्हावे, त्यांना तात्पुरती जागा उपलब्ध करून द्यावी. गोपाल कोठावदे , व्यावसायिक
व्यावसायिकांचा प्रश्न सोडवा
- मार्के टच्या आत असणार्‍या गाळेधारकांना कोणत्याही सुविधा उपलब्ध नाही. शिवाय मार्केटच्या बाहेर बसणार्‍यांमुळे व्यवसायावर परिणाम होतो. त्यामुळे नवीन मार्केट उभारताना पार्किंग, बाहेर बसणार्‍या व्यावसायिकांना दुसरीकडे जागा देणे या बाबी विचारात घेऊन येथील व्यावसायिकांचा प्राधान्याने विचार करावा. अशोक अमृतकर, व्यावसायिक
121 वर्षांपूर्वीची शाळा नं.1
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली शाळा नंबर एक ही 1893मध्ये स्थापन करण्यात आली आहे. तिला आता 121 वर्षे पूर्ण होत आहेत. या शाळेची दुरवस्था झाली आहे. या जागेवर महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू होणार आहे.