आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापीनगर उपकेंद्राच्या उभारणीचे काम सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शहरातील उत्तर भागातील वीजगळती थांबवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणा-या तापीनगर उपकेंद्राच्या उभारणीचे काम अखेर सुरू झाले आहे. तापीनगर परिसरातील जमिनीचे समतलीकरण सुरू असून पावसाळ्यात फाउंडेशनचे काम पूर्ण होणार आहे. येत्या सहा महिन्यांत काम पूर्ण होऊ शकते.

आरएपीडीआरपी योजनेतून शहरासाठी 33 बाय 11 केव्ही क्षमतेचे दोन उपकेंद्र मंजूर करण्यात आले होते. नाहाटा महाविद्यालयामागील भागात एका उपकेंद्राची उभारणी झाली. सध्या यातून जामनेर रोडवरील भागाला वीजपुरवठा होतो. मात्र, तांत्रिक कारणांमुळे तापीनगरातील सबस्टेशनची उभारणी थांबली होती. वीज वितरण कंपनीने पुणे येथील मे. दास इलेक्ट्रिकल्स प्रा. लिमिटेड या कंपनीला काम दिले आहे. या कंपनीकडून जमीन समतल करण्यासह फाउंडेशन ते उपकरणांच्या उभारणीपर्यंतचे संपूर्ण काम करण्यात येणार आहे. तापीनगरात महसूल विभागाकडून घेतलेली उपकेंद्राची जागा उंचसखल असल्याने उपकेंद्राचे काम तब्बल एक वर्ष रखडले होते. सद्य:स्थितीत या भागात उपकेंद्र नसल्याने साकेगाव येथील 33 बाय 11 केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठा घेण्यात येतो. फीडर ते सबस्टेशनचे अंतर अधिक असल्याने वीजगळतीच्या प्रमाणात वाढ होते. आता शहरातील उत्तर भागातच उपकेंद्राची उभारणी होणार असल्याने गळती कमी होईल.

सहा महिन्यांची मुदत
वीज वितरण कंपनीकडून उपकेंद्राच्या उभारणीसाठी मे. दास इलेक्ट्रिकल्स प्रा. लिमिटेड कंपनीला सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. जानेवारी 2015 पर्यंत या उपकेंद्राचे काम पूर्ण होईल. पावसाळ्यातही फाउंडेशनचे काम सुरू राहणार असल्याची माहिती वीज कंपनीच्या सूत्रांनी ‘दिव्य मराठी’ला दिली आहे.