आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वीज कंपनीचा असाही फतवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - घर, दुकान, कॉम्प्लेक्स असे कुठलेही बांधकाम करताना त्या जागेवरून वीजवाहिनी गेली असल्यास त्या ठिकाणी असलेल्या वीजवाहिनीवर पाइपचे कव्हर अथवा रबर इन्स्युलेशन लावू नये आणि असा प्रकार जेथे आढळेल त्या ठिकाणी नोटीस बजावून कारवाई करावी, असा फतवा महावितरणतर्फे बजावण्यात आला आहे. त्यामुळे नव्याने बांधकाम करणार्‍या नागरिकांना मोठा फटका बसणार आहे.
शहरात जागोजागी वीजवाहिन्यांना लागून मोठय़ा प्रमाणात बांधकामे झालेली आहेत. अशा बांधकामामुळे वीजवाहिनीतून विद्युतप्रवाह घरात उतरणे, घरातील व्यक्तींना विजेचा शॉक लागणे अशा अनेक घटना शहरात घडल्या आहेत. अशा घटनांसाठी सरळ वीज कंपनीला दोषी धरले जात असल्याचे म्हणत महावितरणने एका परिपत्रकाद्वारे शहरातील आपल्या सर्व उपकेंद्रातील कर्मचार्‍यांना बांधकामावरून गेलेल्या वीजतारांना कुठल्याही प्रकारचे पाइप अथवा रबर इन्स्युलेशन लावू देऊ नये, तसेच अशी मागणी करणार्‍या नागरिकांना नोटीस बजावून कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत.
महावितरणच्या या परिपत्रकानुसार शहरामध्ये बर्‍याच ठिकाणी वीजवाहिनीजवळ किंवा खाली निवासी घर, दुकान आदींचे विनापरवानगी बांधकाम होते. या ठिकाणी वीजवाहिनीचे पहिल्यापासूनच अस्तित्व असते आणि बांधकामाबाबत वीज वितरण कंपनीला कोणत्याही माध्यमातून कळवले जात नाही. अशा ठिकाणी दुर्घटना होऊन जीवित अथवा वित्तहानी झाली तर मात्र, वीज कंपनीला नाहक जबाबदार धरले जाते. त्यामुळे कंपनीची प्रतिमा मलिन होते. वीजवाहिनी उभारणी आणि निवासी बांधकामाबाबत भारतीय विद्युत नियम 1956 नुसार सुरक्षित अंतराच्या नियमाचे पालन नागरिकांनी करणे गरजेचे आहे. मात्र वीजवाहिन्यांपासून सुरक्षित अंतर राखून बांधकाम केले जात नाही. त्यामुळे अशा प्रकारचे अपघात घडतात. विद्युत नियमाचे पालन केल्यास अपघात टळू शकतात. त्यामुळे अशा प्रकारे बांधकाम करणार्‍या नागरिकांनी वीजतारांना पाइप टाकून देण्याचा अर्ज आल्यास अथवा असा प्रकार परस्पर होत असल्याचे दिसल्यास सदर अवैध बांधकाम करणार्‍या व्यक्तींना सावधगिरीचा उपाय म्हणून नोटीस द्यावी, कुणालाही पाइप अथवा रबर इन्स्युलेशन तारमार्गावर टाकण्यात येऊ नये. ही प्रमाणित अणि प्रचलित पद्धत नाही. असे लेखी आदेशच महावितरणतर्फे शहरातील सर्व कनिष्ठ अभियंते आणि उपकेंद्रातील कर्मचार्‍यांना बजावण्यात आले आहेत.
मागे चुकलो, आता सुधारलो - महावितरणने अचानक अशा प्रकारे वीजवाहिनीखाली अथवा जवळ बांधकाम करणार्‍यांना सुरक्षेचा उपाय म्हणून प्लास्टिक पाइप अथवा रबर इन्स्युलेशन लावू न देण्याचे पत्रक काढले असले तरी यापूर्वी सर्रासपणे वीज कंपनीच्याच अधिकारी, कर्मचार्‍यांनी वीजतारांना पाइप टाकून दिले आहे. याबाबत ‘दिव्य मराठी’ने विचारणा केली असता, महावितरणच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, यापूर्वी आमचे लोक चुकले पण आता तीच चूक पुन्हा पुन्हा करायची काय? त्यामुळे आता सरळ परिपत्रक काढून सर्वांना आदेश दिले आहेत. कुणी अशा प्रकारे पाइप टाकून दिले तर त्या कर्मचार्‍यांवरही कडक कारवाई करण्यात येईल.
कायद्यानुसार सुरक्षित अंतर - वीजतारांपासून सुरक्षित अंतरावर बांधकाम व्हावे यासाठी असलेल्या भारतीय विद्युत नियमन 1965च्या कायद्यानुसार वीजवाहिनीपासून घर अथवा इमारतीचे अंतर निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार एक ठराविक अंतर असणे आवश्यक आहे. त्यात वर किंवा खाली लघुदाब वाहिनीसाठी 2.5 मीटर तर उच्च्दाब वाहिनीसाठी 3.7 मीटर असे आहे. तर आडवे म्हणजे वीजतारांपासून जवळचे अंतर लघुदाब वाहिनीसाठी 1.219 मीटर आणि उच्च्दाब वाहिनीसाठी 2 मीटर असे निश्चित करण्यात आले आहे. वीजतारांपासून हे अंतर राखूनच बांधकाम करावे, बांधकामाची परवानगी देताना याच अंतराचा निकष वापरला जातो. तरच परवानगी दिली जाते. असा महावितरणचा दावा आहे.
नागरिकांना बसणार फटका - महावितरणच्या या नियमाप्रमाणे बांधकाम करण्याचे निश्चित केल्यास शहरातील हजारो नागरिकांना फटका बसणार आहे. कारण शहरातील अनेक भागांमध्ये महावितरणने पूर्वीपासून टाकून ठेवलेल्या विद्युत खांबांजवळ अथवा वीजवाहिनीच्या खालून, वीजवाहिनीना लागून प्लॉट पाडण्यात आले आहेत. नागरिकांना इंच इंच जमिनीची किंमत मोजावी लागत असल्याने अशा प्रकारे दोन ते तीन मीटर जागा सोडून देणे हे परवडणारे नाही. त्यामुळे डोक्यावर वीजवाहिनीच्या रूपात प्रत्यक्ष मृत्यू लटकत असला तरी लोक सर्रासपणे त्याखाली अथवा लागून बांधकाम करताना आढळून येत आहेत. यापुढे बांधकाम करतांना काळजी घेणे आवश्यक राहील.