आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उतरण्याच्या स्टेशनवर जागे करणार ‘रेल अलार्म’!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मोबाइलच्या वेगवेगळ्या इंटरफेस व डेस्कटॉपवरून रेल्वेगाड्यांच्या चालण्याच्या वेळा तसेच उशिराबाबत क्षणभरात माहिती पुरविणा-या स्पॉट युवर ट्रेन वेबसाइटने ‘रेल अलार्म’ हे खास अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅप विकसित केले आहे. रात्री-पहाटे अनेकदा आपले स्टेशन मागे पडल्यानंतर प्रवाशांना जाग येते व ते संकटात सापडतात. अशा प्रवाशांना त्यांचे उतरण्याचे स्टेशन येण्यापूर्वी ‘रेल अलार्म’ जागे करील. त्यामुळे आता स्टेशन येईपर्यंत पेंगुळत जागे राहण्याऐवजी प्रवाशांना निर्धास्त होऊन झोपता येईल.

ट्रेनमधून रात्री-पहाटे प्रवास करताना अनेक प्रवाशांसमोर समस्या असते ती नेमक्या स्टेशनवर उतरण्याची. अनेकवेळा रेल्वेस्थानकावर पोहोचल्यानंतर गाडीला उशीर झाल्यामुळे प्रतीक्षालयात थांबावे लागते. तेथे प्रवाशी बराच वेळ जागा राहतो. मात्र, नेमकी गाडी येण्याच्या वेळी त्याचा डोळा लागतो अन् ती हुकते. या सर्व समस्यांवर ‘रेल अलार्म’ हा हमखास उतारा ठरू शकेल. परदेशात अशी रेल्वेगाडीच्या वेळापत्रकाशी सुसंगत अनेक अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅप आहेत; पण भारतीय
रेल्वेच्या वेळापत्रकाशी सुसंगत अ‍ॅप आजवर नव्हते.

हे अ‍ॅप ‘गुगल प्ले स्टोअर’मधून फ्री डाऊनलोड करता येते. आपण रेल्वेगाडीचा क्रमांक द्यायचा आणि ती कुठल्या स्टेशनपासून किती किलोमीटरवर आली की अलार्म वाजवायचा, हे आपल्या नेहमीच्या घडाळ्याच्या अलार्मप्रमाणे सेट करायचे. ती गाडी त्या परिघात येताच अलार्म वाजू लागेल. अर्थात ही सुविधा मिळवण्यासाठी प्रवाशांना आपल्या मोबाइलवरील जीपीआरएस किंवा वाय-फाय कनेक्शन ऑन ठेवावे लागेल.

नियमित अलार्मपेक्षा वेगळा कसा
प्रवासी आपल्या मोबाइलच्या नियमित अलार्मवरही वेळ सेट करून ठेवू शकतात. मात्र, असा अलार्म नेमका त्या वेळेला वाजतो. गाडी उशिरा येण्याशी किंवा वेळ भरून काढून लवकर येत असेल तर त्याच्याशी हा अलार्म सुसंगत नसतो. मात्र, ‘रेल अलार्म’ हे अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅप रेल्वेच्या रिअल टाइम रनिंग पोझिशनशी आॅनलाइन सिन्क्रोनाइज होत असते. गाडी लवकर-उशिरा धावत असली तरी प्रवाशाने दिलेल्या स्टेशनपासून ठराविक किलोमीटरवर येताच अलार्म वाजतो. तेव्हा नेमके किती वाजले, याच्याशी काही संबंध नसतो. नेमक्या वेळीच प्रवाशाला जागवले जाते.

कुठून डाऊनलोड करता येईल
स्पॉट युवर ट्रेन वेबसाइटवरून (http://www.spoturtrain.com) ‘रेल अलार्म’ अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅप डाऊनलोड करता येईल. याशिवाय ‘गुगल प्ले’वर ‘रेल अलार्म’ अशी सर्च करूनही हे अ‍ॅप डाऊनलोड करता येईल.