आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे सुरक्षा बलाने केली तीन ‘तेजस्विनी’ पथकांची नियुक्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - रेल्वेने प्रवास करणा-या महिलांच्या सुरक्षेसाठी भुसावळ विभागात आरपीएफने गुरुवारपासून तीन तेजस्विनी पथकांची नियुक्ती केली आहे. तीन पथकात 18 कर्मचारी कार्यरत आहेत. यात आरपीएफच्या महिला कर्मचा-यांचाही समावेश आहे. भुसावळ विभागातील मनमाड, नाशिक रोड आणि भुसावळ या ठिकाणी ही पथके नियुक्त आहेत.

रेल्वेने प्रवास करणा-या महिलांना गाडीत होणारा त्रास आणि जागेवरून महिलांसोबत वाद झाल्याच्या तक्रारींची वाढती संख्या, या बाबींची आरपीएफने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार आरपीएफचे मध्य रेल्वेचे मुंबई येथील मुख्य सुरक्षा आयुक्त अजयकुमार सिंग यांनी मध्य रेल्वेच्या भुसावळ, नागपूर, मुंबई, पुणे आणि सोलापूर या पाच विभागांतील आरपीएफ आयुक्त आणि वरिष्ठ आयुक्तांची विशेष बैठक आयोजित केली होती. या बैठकीत तेजस्विनी पथक नियुक्त करण्यावर चर्चा झाली. महिलांच्या डब्यात बसणारे पुरुष प्रवासी महिलांसोबत वादविवाद करतात. यामुळे महिलांच्या डब्यात बसून प्रवास करणा-या पुरुषांवर रेल्वे अ‍ॅक्टनुसार कारवाई केली जावी, तसेच अन्य डब्यातून प्रवास करणा-या महिलांनाही सुरक्षा मिळावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तेजस्विनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना मुख्य सुरक्षा आयुक्तांनी दिल्या आहेत.

आयुक्तांनी घेतली बैठक
मुंबई येथील मुख्य सुरक्षा आयुक्तांच्या बैठकीतून परतल्यानंतर आरपीएफ आयुक्त चंद्र मोहन मिश्र यांनी भुसावळ विभागातील सर्व प्रभारी अधिका-यांची क्राइम बैठक घेतली. महिलांच्या तक्रारी सोडवण्यास प्राधान्य द्या, महिलांनी केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका, अशा सूचना आयुक्त मिश्र यांनी दिल्या.

भुसावळ विभागात पूर्वी भुसावळ आणि खंडवा या दोन ठिकाणी तेजस्विनी पथकांची नियुक्ती होती. मात्र, आता पथकांची संख्या वाढून तीन झाली आहे. आता भुसावळ, मनमाड आणि नाशिकरोड या तीन ठिकाणी पथकांची नियुक्ती असेल. तिन्ही ठिकाणी नियुक्त केलेल्या पथकांचे कार्यक्षेत्र ठरलेले आहे. मनमाड येथील पथक पाचोरा, चाळीसगावपर्यंत तर भुसावळचे पथक खंडवा, बडनेरा, जळगावपर्यंत कारवाई करू शकते. दोषी आढळणा-या प्रवाशाला जवळच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिस ठाण्यात जमा करण्याचे आदेश आयुक्त मिश्र यांनी दिले आहेत.

मदतीसाठी हेल्पलाइन
रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना रेल्वे सुरक्षा बलाची मदत हवी असल्यास रेल्वेने हेल्पलाइन क्रमांक जाहीर केले आहेत. त्यानुसार (02582) 222192 (भुसावळ), (022) 22262800 (मुंबई) आणि पूर्ण देशासाठी 1322 या क्रमांकांवर संपर्क साधल्यास प्रवाशांना तत्काळ मदत मिळू शकेल.
अशी केली आहे पथकाची रचना
तेजस्विनी पथकात चार महिला, तर दोन पुरुष आरपीएफ कर्मचारी असतील. साध्या वेशातील हे कर्मचारी धावत्या गाड्यांमध्ये गस्त घालणार आहेत. यापूर्वी स्थापन करण्यात आलेले तेजस्विनी पथक केवळ चार महिनेच कार्यान्वित होते. मात्र, मुख्य संरक्षा आयुक्त अजयकुमार सिंग यांच्या सूचनेनुसार कायमस्वरुपी पथकाची नियुक्ती केली आहे.

आरपीएफशी संपर्क साधावा
- भुसावळ विभागातून धावणा-या गाड्यांमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी तेजस्विनी पथके पुन्हा कार्यान्वित केली आहेत. गुरुवारपासूनच पथकांनी कारवाई सुरू केली आहे. महिला प्रवाशांना रेल्वेगाडीत कोणताही त्रास होत असल्यास त्यांनी आरपीएफच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. चंद्र मोहन मिश्र, आयुक्त, रेल्वे सुरक्षा बल, भुसावळ