आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिनदर्शिकांनाही बसला वाढत्या महागाईचा फटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - कागदाचे गगनाला भिडलेले दर आणि वाढत्या महागाईचा फटका दिनदर्शिकेच्या निर्मितीला बसला आहे. दरवर्षी अनेक संस्था दिनदर्शिकेचे प्रकाशन करतात. मात्र, यंदा अनेक संस्था मागे हटल्या आहेत. त्यामुळे दिनदर्शिकेतून होणारी उलाढाल तब्बल 20 टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे रोजगारावर परिणाम झाला आहे.

2013 हे वर्ष संपण्यास दोनच दिवस राहिले असून आता सर्वच नागरिकांना नववर्षाच्या स्वागताचे वेध लागले आहेत. त्यामुळे जो तो आपापल्या सोईनुसार नववर्ष दिनदर्शिकेकडे लक्ष वेधतो आहे. साधारणत: डिसेंबरच्या सुरुवातीलाच कालनिर्णयसह अन्य नामांकित प्रकाशकांच्या दिनदर्शिका बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. याचसोबत बँका, पतपेढ्या, विविध नामांकित संस्था, कंपन्यांच्याही दरवर्षी दिनदर्शिका प्रकाशित होतात. यातील सर्वांच्याच दिनदर्शिका सभासद, ग्राहकांना मोफत वितरित केल्या जातात. परंतु यंदा स्थानिक पातळीवर छापल्या जाणार्‍या दिनदर्शिकेची संख्या घटली आहे. त्यासाठी अनेक कारणे असल्याची माहिती जाणकारांकडून समोर आली आहे.

दरवर्षी साडेदहा लाख दिनदर्शिका प्रकाशित
शहरात स्थानिक संस्थांच्या साडेदहा लाख दिनदर्शिका साधारणत: दरवर्षी प्रकाशित होतात. यंदा तीन लाखांनी घट झाली आहे. त्यामुळे बाजारात साडेसात लाख दिनदर्शिका येणार असल्याचे शहरातील ऑफसेट मालकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे व्यवसायावर तब्बल 20 टक्के परिणाम झाला असून रोजगारही कमी झाला आहे. संभाजी बाइंडिंग येथे किमान साडेतीन लाख कॅलेंडरला पट्टी मारली जात होती. मात्र, यंदा जेमतेम दीड लाख कॅलेंडर बाइंडिंग झाल्याचे संबंधितांनी सांगितले.

मोजक्याच पतसंस्थांच्या दिनदर्शिका
पतसंस्थांचे आर्थिक व्यवहार डबघाईस आल्याने गेल्या दोन वर्षांपासून दिनदर्शिकेकडे त्यांनी कानाडोळा केला आहे. बोटावर मोजण्याइतक्याच पतसंस्थांच्या दिनदर्शिका बाजारात येणार आहेत. अन्य खाजगी संस्था दिनदर्शिका प्रसिद्ध करण्यास अनुत्सुक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. कागदाच्या दरवाढीमुळे दिनदर्शिकेची मूळ किंमतही निघणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे साध्या कागदाचा वापर करून अगदी कमी नफ्यावर दिनदर्शिका काढली जात आहे. त्यामुळे गेल्या वर्षापासून मोठ्या ऐवजी छोट्या दिनदर्शिका काढण्यावर भर दिला जात आहे.

प्रचंड स्पर्धेमुळे कमी नफ्यात करावा लागतोय व्यवसाय
पतपेढ्यांच्या दिनदर्शिका जवळपास बंदच झाल्या. प्रचंड स्पर्धेमुळे कमी नफ्यात व्यवसाय करावा लागतो. बीएचआर, जनता बँक, गोदावरी यासह नियमित छापणार्‍या संस्थांनी यंदाही दिनदर्शिका छापल्या. परंतु इतरांनी याकडे दुर्लक्ष केल्याने रोजगारावर परिणाम झाला आहे.

संजय महाजन, महाजन ऑफसेट
कागदाचे भाव, मजुरी वाढल्याने दिनदर्शिकांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. ठरावीक कंपन्या, संस्थांच्या दिनदर्शिका यंदाही प्रकाशित होतील. पण स्थानिक पातळीवरील व्यवसायावर परिणाम झाला आहे. दरवर्षी तीन ते चार लाख दिनदर्शिका छापायचो. यंदा जेमतेम 50 हजार छापल्या. - नंदू परदेशी, श्री ऑफसेट