आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव-पाण्याच्या शोधात आलेल्या बिबट्याचा शेतमजुरावर हल्ला; दंडाला चावा, छातीवर मारला पंजा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिबट्याच्या हल्य्यात जखमी झालेला दुरसिंग बारेला. - Divya Marathi
बिबट्याच्या हल्य्यात जखमी झालेला दुरसिंग बारेला.
जळगाव- अन्न-पाण्याच्या शोधात फिरत असलेला बिबट्या शहराच्या वेशीवर आला असून त्याने एका शेतमजुरावर हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता रायपूर (कुसुंबा) येथील शेतात घडली. सुदैवाने या झटापटीत शेतमजुराचा जीव वाचला आहे. यामुळे मात्र, नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. माणसावर बिबट्याने हल्ला केल्याची जिल्ह्यातील चार वर्षातली ही दुसरी घटना ठरली आहे. पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या शेतातील विहिरीजवळ बसला होता. बारेला यांना पाहताच त्याने हल्ला केला असा अंदाज आहे. 
 
रायपूर शिवारात चंदन वसंतराव कोल्हे यांच्या मालकीचे शेत आहे. या शेतात कंडारी येथे राहणारे दुरसिंग कन्हैया बारेला (वय ३२) हे शुक्रवारी सकाळी काम करीत असताना साडेसात वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्या बाजूला असलेल्या झुडपांमधून बिबट्या बाहेर आला. सेकंदाच्या आतच बिबट्याने थेट त्यांच्या अंगावर उडी घेत उजव्या हाताच्या दंडावर दात गाडले तर छातीवर पंजा मारला. बारेला यांनीही जीवाच्या अाकांताने प्रतिकार केला. तर हल्ला केल्यानंतर एका सेकंदातच बिबट्या जंगलाच्या दिशेने निघून गेला. बारेला यांनी आरडाओरड केल्यामुळे परिसरातील शेतमजुरांना घटनेची माहिती मिळाली. त्यांनी बारेला यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नशिब बलवत्तर म्हणून बारेला यांचा जीव वाचला. हा पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या विहीरीजवळ बसला होता. विहीरीभोवती पाणी असल्याने थंडाव्यात तो बसला असावा आणि बारेला यांना पाहताच त्याने हल्ला केला असण्याची शक्यता आहे, असे वन्यजीव तज्ज्ञांनी सांगितले. या हल्ल्यानंतर वनपाल जी.के.बडगुजर वनरक्षक डी.ए.जाधव यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. 
 
चार वर्षांतली दुसरी घटना 
गेल्यादीड-दोन वर्षांपासून शहराच्या वेशीवर बिबट्यांचा अधिवास वाढला आहे. गेल्या वर्षी आव्हाने शिवारात सलग सात-आठ दिवस बिबट्याने धुमाकूळ घातला होता. यावर्षी देखील गेल्या आठवड्यात आव्हाने, खेडी शिवारात बिबट्या आढळून आला आहे. दरम्यान, वाघूर, उमाळा, विमानतळ, कुसुंबा, रायपूर या भागातही बिबट्यांचा वावर आहे. चार वर्षांपूर्वी वाघूर धरण परिसरात एका लहान मुलावर बिबट्याने हल्ला केला होता. त्यानंतर शुक्रवारी बारेला हे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. 
 
पाण्याचे दुर्भिक्ष, वाढत्या तापमानामुळे वन्यजीवही त्रस्त 
सध्या उन्हाची तीव्रता ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेली आहे. त्यामुळे माणसांसह वन्यप्राणीही देखील त्रस्त झाले आहेत. अन्नाच्या शोधासाठी बिबट्यांचा शहराकडे वावर वाढत असल्याच्या घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत. जंगलातील तृणभक्षक प्राणी कमी झाल्यामुळे बिबट्यांना सहज अन्न उपलब्ध होत. नाहीत्यामुळे जंगलांना लागून असलेले शेत, गावांमध्ये थेट प्रवेश करतात. खळ्यामध्ये बांधलेले वासरू, बकऱ्या, गावातील कुत्री ही त्यांना सहज उपलब्ध होत असतात. दिवसाच्या उजेडात गावालगतच शेतात, जंगलात थांबून रात्री ते पुन्हा गावात येऊन शिकार करीत आहेत. तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जंगलातील पाणवठे देखील कोरडे पडले आहेत. अशात जंगलकाठच्या शेतांमध्ये पाण्याच्या शोधात बिबटे येत आहेत. शिवाय येथे वातावरण थंड असल्यामुळे देखील त्यांचा अधिवास वाढतो आहे. शुक्रवारी रायपूर येथे घडलेल्या घटनेवरून देखील हे उदाहरण समोर आले आहे. 
 
गेल्यावर्षी बिबट्याचा मृत्यू 
शेतात नुकसान करणाऱ्या जंगली डुकरांना पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात अडकल्यामुळे सुटकेसाठी १२ तास प्रयत्न करणाऱ्या बिबट्याचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना १२ जून २०१६ रोजी रवंजा येथे घडली होती. या घटनेचा तपास अद्याप वनविभागाकडून सुरुच आहे. जळगाव जिल्ह्यात आव्हाने ते पद्मालय आणि वाघूर धरण ते कुसुंबा गाव, शिरसोलीचे जंगल, विमानतळ परिसर हा बिबट्यांचा संचार मार्ग आहे. जिल्ह्यात सात ते आठ बिबटे असल्याचा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला आहे. 
 
हल्ल्याचा उद्देश नसतो 
-माणसांवर हल्ल्याचा उद्देश नसतो. अन्न-पाण्याच्या शोधात शहराकडे येत असलेल्या बिबट्यांचा माणसांवर हल्ला करण्याचा उद्देश नसतो. त्या-त्या वेळच्या परिस्थितीवर हे अवलंबून असते. स्वत:च्या जिवाला धोका असल्याचे समजून वन्यप्राणी माणसांच्या दिशेने हल्ला करतात. वासुदेव वाढे, अध्यक्ष, वन्यजीव संरक्षण संस्था 
 
 
जखमीस भरपाई देण्यात येईल 
- बारेला यांच्यावर झालेला हल्ला बिबट्याचा आहे. या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून वरिष्ठांना माहिती देण्यात आली आहे. नियमानुसार बारेला यांना भरपाई देण्यात येईल. जी.के.बडगुजर,वनपाल 
बातम्या आणखी आहेत...