आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातात सळई घुसूनही चेहरा पूर्ववत, संपूर्ण चेहऱ्यावरील हाडे फ्रॅक्चर; सहा महिने उपचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- कंडारीते उमाळा फाटा दरम्यान १६ अाॅक्टाेबर २०१५ मध्ये खासगी प्रवासी वाहतूक करणारी लक्झरीचा अपघात झाल्याने ती कलंडली होती. यात गंभीर जखमी झालेल्या पहूर येथील सुफियाबी कामीलखान पठाण या सहा महिन्यांच्या उपचारानंतर सुखरूप घरी परतल्या आहेत. दरम्यान, या अपघातात सुफियाबी यांचा चार वर्षीय मुलगा राहिलचा मृत्यू झाला हाेता.
जास्त प्रवासी मिळवण्याच्या लोभापायी चालकाने भरधाव लक्झरी पुढे नेल्याने १६ अाॅक्टाेबर २०१५ राेजी कंडारी-उमाळा फाट्यादरम्यान अपघात झाला हाेता. यात राहिल पठाण क्लिनर कृष्णा शंकर राजपूत या दोघांचा मृत्यू झाला होता. तर सुफियाबी पठाण यांच्या जबड्यात लोखंडी सळई घुसल्यामुळे त्या अत्यंत गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर त्यांच्या शरीराच्या सर्व हालचाली थांबवल्या होत्या. प्रथमदर्शनी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांसह नागरिकांना वाटत होते. मात्र, प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यांच्या हाताची नस थाेडी स्पंदन करीत होती. त्यामुळे कुटंुबीयांनी तत्काळ निर्णय घेऊन त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. पुढे डॉ.दत्तात्रय बिरासदार आणि डॉ. राजेश पाटील या दोन डॉक्टरांनी सुफियाबी यांच्यावर अत्यंत काळजीपूर्वक उपचार केले. त्यानंतर डॉ. चौधरी यांनी प्लास्टिक सर्जरी करून सुफियाबी यांच्या चेहऱ्यावरील व्रण काढून त्यांना पूर्वीचे रूप दिले.

सुफियाबी यांना केवळ २० मिनिटे जिल्हा सामान्य रुग्णालयात ठेवण्यात आले. अजून १०-१५ मिनिटे वाया गेली असती तर कदाचित त्यांची प्राणज्योत मालवली असती, अशी परिस्थिती होती. अशाच अवस्थेत कुटुंबीयांसह डॉ. बिरासदार यांनी सुफियाबी यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या जबड्यात लोखंडी सळई घुसल्यामुळे चेहऱ्यावरील सर्व हाडे फ्रॅक्चर झाली होती. डोक्यावर मार लागला होता. तसेच अंतर्गत रक्तस्त्रावही खूप झाला होता. शरीरातील मोठ्याप्रमाणात रक्त वाया गेल्यामुळे तीन दिवस त्यांना शुद्धही नव्हती. सुरुवातीला चेहऱ्यावरील हाडांची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांना थोडीफार शुद्ध आली. नंतर पुढील एक-एक करून उपचार सुरू झाले. डॉ. बिरासदार आणि डॉ. राजेश पाटील यांनी अत्यंत काळजीपूर्वक त्यांच्यावर उपचार केले. त्यांचे उपचार यशस्वी झाल्यानंतर शहरातीलच एका खासगी रुग्णालयात डॉ.चौधरी यांनी सुफियाबी यांच्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करून त्यांना पूर्वीचा चेहरा प्राप्त करून दिला.