आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेदहा तासांमध्ये हटवली 51 अतिक्रमणे, जामनेररोडवर अतिक्रमण काढतांना संताप व्यक्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - पालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेत मंगळवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी या काळात १० तासांमध्ये ५१ अतिक्रमणे हटवण्यात आली. जेसीबीद्वारे अतिक्रमित बांधकामे पाडण्यात आली, तसेच टपऱ्या हटवण्यात आल्या. पालिका प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात ७५० अतिक्रमित टपऱ्यांची नोंद करण्यात आली होती. मात्र कारवाईपुर्वीच संबंधितांनी सोमवारी रात्री टपऱ्या रातोरात उचलल्या. दरम्यान जामनेररोडवरील भोळे भरीत पुरी सेंटरचे अतिक्रमण काढतांना अतिक्रमणधारक महिलेने पालिका प्रशासनावर संताप केला. 
 
पालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला मंगळवारी सकाळी यावल नाक्यापासून सुरूवात झाली. गांधी पुतळ्यापर्यंत अतिक्रमित जागेवरील टपऱ्या कारवाईपूर्वीच उचलल्याने शांतीनगर, गोपाळनगर भागात कारवाई करण्यात आली. 
 
या भागातील पक्की घरे पाडण्यात आली. तर म्युनिसीपल पार्कमध्ये रस्ता अडवून उभारलेले टेंट हाऊस नष्ट करण्यात आले. मंगळवारी राबवलेल्या मोहिमेत यावलरोड, शांतीनगर, गोपाळनगर, म्युनिसीपल पार्क, गरुड प्लॉट, तापीरोड, जामनेररोड, न्यू एरिया वॉर्ड, अष्टभुजा देवी मंदिराच्या मागील भागात तब्बल २५ टपऱ्या, चार पक्की घरे, १८ ठिकाणचे अतिक्रमित ओटे, मोठे पत्री शेड अशी एकूण ५१ अतिक्रमणे जेसीबीद्वारे नष्ट करण्यात आली. 
 
सत्ताधाऱ्यांची अतिक्रमणेही काढली 
सत्ताधारी गटाचे नगरसेवक रमेश नागराणी यांच्या नागराणी टॉवरबाहेरील पेव्हर ब्लॉक गटारीवरील बांधकाम पाडण्यात आले. तर जामनेररोडवरील नगरसेवक निर्मल कोठारी यांच्या मालकीच्या साईजीवन शॉपबाहेरील अँगल त्यांनी काढले. शांतीनगरात नगरसेवकाच्या अंगणातील पेव्हर ब्लॉक मात्र कायम आहेत.

राणे भवनला अभय 
गरुड प्लॉट भागात राणे भवन या इमारतीसमोर नऊ फुटांचे तार कंपाऊंडचे अतिक्रमण आहे. पालिकेचा ताफा या ठिकाणी पोहोचला. मात्र राजकीय दबावामुळे कारवाई करताच ताफा माघारी फिरला. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी यावर बोलणे टाळले. 
 
अतिक्रमणविरोधी कारवाई नि:पक्षपणे केल्याचा पालिका प्रशासनाचा दावा 
पाच लाखांचेसाहित्य जप्त गोपाळनगरपरिसरात पालिकेच्या भूखंडावरील चार पक्की घरे पाडण्यात आली. तर म्युनिसीपल पार्क भागात गेल्या दहा वर्षांपासून रस्ता अडवून उभारण्यात आलेले माजी नगरसेवक मधुकर तुते यांचे टेंन्ट हाऊस जमीनदोस्त करुन सुमारे पाच लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. या मोहीमेत काही बड्यांना अभय देण्यात आल्याचा आरोप झाला. मात्र प्रशासनाने या आरोपाचे खंडन करुन निप:क्षपणे कारवाई केल्याचा दावा केला आहे. 
 
व्यायाम शाळेवर टाच : जामनेररोड वरील अष्टभुजा बहुउद्देशीय संस्थेची ५० बाय १५ फुट जागेवर असलेल्या व्यायमशाळेवरही मोहीमेदरम्यान कारवाई करण्यात आली. या व्यायमशाळेत दररोज ६० युवक कसरत करण्यासाठी येत होते. कारवाईत व्यायमशाळेच्या उपकरणांची नासधूस झाली. दारु दुकानांना अभय तर व्यायमशाळेवर झालेली ही कारवाई अन्यायकारक असल्याची खंत मंडळाचे अध्यक्ष नारायण तांबट यांनी व्यक्त केली. 
 
कारवाईत सातत्य हवे : पालिकेने २८ जानेवारी २०१६ रोजी शहरात ९८ ठिकाणी कारवाई करून ३२५ अतिक्रमणे हटवली होती. या मोहीमेला दोन वर्ष पूर्ण होत नाही, तोच पुन्हा अतिक्रमणांचा धडाका सुरु झाला होता. वारंवार मोहीम राबवून अतिक्रमण काढण्याऐवजी ही मोहीम सातत्याने राबवल्यास पालिकेचा खर्च, मनुष्यबळावरील ताण वाचून वाहतुकीतील अडथळे दूर होतील. मोहिमेत ड्यूटी घेतलेल्या तसेच गैरहजर कर्मचाऱ्यांची मुख्याधिकाऱ्यांनी खरडपट्टी काढली. 
 
जामनेररोडवरील भोळे भरित पुरी सेंटरचे अतिक्रमण काढताना संचालिका कल्पना योगेश भोळे यांनी मज्जाव केला. तब्बल अर्धा तास चर्चेअंती या अतिक्रमणावर जेसीबी चालवण्यात आले. भोळे परिवारातील सदस्यांच्या डोळ्यातील अश्रुधारा पाहून उपस्थित जमावाचेही डोळे पाणावले. मात्र, मोहिमेत नि:पक्षपातीपणा आणत प्रशासनाने ही कारवाई पूर्ण केली. मोठ्या कष्टाने उभारलेल्या व्यवसायाचे बांधकाम डोळ्यादेखत जेसीबीद्वारे उद्ध्‍वस्‍त होत असताना भोळे कुटुंबीयांनी अश्रू अनावर झाले. त्यामुळे अतिक्रमणविरोधी मोहिमेत जामनेर रोडवर भावनिक स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान बुधवारी सकाळपासून जळगावरोड, महात्मा गांधी पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग बाजारपेठेतील जनता टॉवरचे बांधकाम पाडले जाणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी बी. टी. बाविस्कर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलतांना दिली. मंगळवारी काही व्यावसायिकांनी कारवाईपुर्वी आपले साहित्य हटवले. बहुतांश भागातील अतिक्रमण हटवण्यात आल्यामुळे मंगळवारी कारवाईचा वेग वाढला. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांचे काम सोपे झाले होते. आता बुधवारी होणाऱ्या कारवाईकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. 
 
असा होता ताफा : पालिकेच्याअतिक्रमण हटाव मोहिमेत पालिकेचे सुमारे ४०० कर्मचारी, ६० पोलिस कर्मचारी, जेसीबी, आठ टॅक्टर, ६० पोलिस कर्मचाऱ्यांचा ताफा, आरसीपी प्लाटून आदींचा ताफा तैनात होता. सहाय्यक पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी भेट देऊन मुख्याधिकाऱ्यांकडून कारवाईची माहिती घेतली. मोहीमेत बाजारपेठचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे, सहाय्यक निरीक्षक मारुती मुळूक आदी अधिकारी पोलिस कर्मचारी हजर होते. 
 
घरकुलातील अतिक्रमण काढणार 
पालिकेच्या सर्वेक्रमांक २९७ मधील घरकुलांमध्येही अनधिकृतपणे नागरिकांचा रहिवास आहे. मोहिमेदरम्यान या घरांमध्ये रहिवास करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई होण्यापूर्वीच नागरिकांनी घरांचा ताबा सोडावा. मोहीमेपूर्वीच ८० टक्के अतिक्रमण परस्पर निघाल्याने वेळ वाचला. आगामी दोन दिवसातही शहरात नियोजनाप्रमाणे कारवाई केली जाणार आहे. 
- बी. टी.बाविस्कर, मुख्याधिकारी, भुसावळ 
 
बातम्या आणखी आहेत...