आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवार देता येत नसेल, तर पद सोडा, 'दादां'नी नेत्यांना खडसावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ‘जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीची मोठी ताकद असूनही विधान परिषदेची जागा विरोधकांनी बिनविरोध काढलीच कशी? या प्रकरणात मोठे फिक्सिंग झाले आहे. त्यामुळे नेत्यांना उमेदवार देता येत नसेल तर त्यांनी बाजूला व्हावे,’ असे खडे बोल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी आपल्या पक्षातील पदाधिकार्‍यांना सुनावले.

जळगावात राष्ट्रवादीचा ‘निर्धार मेळावा’ झाला. त्यात अजित पवार बोलत होते. ते म्हणाले की, विधान परिषदेच्या निवडणुकीत पक्षातील नेत्यांना वयाची अट माहीत नव्हती, हे न पटणारे आहे. लोकसभेतील पराभवाकडे ‘मोदी लाट’ म्हणून डोळेझाक करता येईलही; परंतु विधान परिषद निवडणुकीचे काय? मोठा अनुभव असतानाही पक्षातील नेते या निवडणुकीसाठी योग्य उमेदवार देऊ शकले नाहीत. नेत्यांना उमेदवार देणे जमत नसेल तर त्यांनी बाजूला झालेले बरे. तसेच या प्रक्रियेत सहभागी झालेल्यांनी मी जळगाव सोडण्यापूर्वी खुलासा द्यावा,’ अशा सूचना पवारांनी केल्या.

चौकशी करणार
पक्ष ग्रामपंचायतीची निवडणूकदेखील डोळ्यात तेल घालून लढतो; परंतु विधान परिषदेच्या उमेदवारासाठी वयाची 30 वर्षे पूर्ण झालेली हवी, हे माहीत नसणे न पटणारे आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर चौकशीची जबाबदारी पवार यांनी सोपवली.

या बाबी संशयास्पद...
- शरद पवारांनी डॉ. सतीश पाटलांना फोन केला तेव्हा त्यांच्या पुतण्याला उमेदवारी दिल्याचे त्यांना माहीत नव्हते.
- प्रमुख उमेदवाराचा अर्ज बाद ठरल्यास डमी उमेदवार दिला जातो. मात्र, येथे डमी उमेदवाराचा अर्जही बाद झाला.
- पदाधिकार्‍यांना अनेक निवडणुकांचा अनुभव असूनदेखील वयाची अट माहीत नव्हती.
- निवडणूक बिनविरोध व्हावी यासंदर्भात चर्चा होत होती.