आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जलयुक्त शिवार’मुळे मद्यविक्री करणारी महिला वळली शेतीकडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - कोरडवाहू शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने पोट भरण्यासाठी एका आदिवासी कुटुंबावर हातभट्टीची दारू विक्री करण्याची वेळ आली होती; परंतु जलयुक्त शिवार अभियानामुळे शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले अन‌् आदिवासी कुटुंबाने दारू विक्रीचा व्यवसाय बंद करून पुन्हा शेतीकडे लक्ष दिले. त्यांनी गेल्या हंगामात गहू, हरभऱ्याचे भरघोस उत्पन्न घेतले. 
शहरापासून २२ किलोमीटर अंतरावर असलेले चौगाव हे गाव अवर्षणप्रवण क्षेत्रात येते. गावात नेहमी पाणीटंचाई जाणवते. त्यामुळे पावसाळ्याचे चार महिने वगळता उर्वरित आठ महिने गावातील नागरिकांना पोट भरण्यासाठी इतर कामे करावी लागतात. गावातील आदिवासी समाजाच्या सुमनबाई अभिमन दडवी यांचे पती मुलाचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी सुमनबाईंवर येऊन पडली. त्यांची गावापासून जवळच नाल्याकाठी पाच बिघे कोरडवाहू शेती आहे. शेतात विहीर असून, ती कोरडी असल्याने पावसाळ्याचे चार महिनेच शेती करता येत होती. त्यामुळे खरिपाचा हंगाम संपल्यावर सुमनबाईला नाइलाजास्तव कुटुंबाचे पोट भरण्यासाठी शेतालगत असलेल्या नाल्यात हातभट्टीची दारू विक्री करावी लागत होती.
 
दरम्यानच्या काळात गावाची जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवड झाली. अभियानातून गावात पाणी अडवण्यासह ते जिरवण्यासाठी विविध कामे करण्यात आली. सुमनबाई दडवी यांच्या शेताजवळील नाल्यातून गाळ काढण्यात आला. तसेच या नाल्याचे खोलीकरण करण्यात आले. परिणामी पूर्वीच्या तुलनेत नाल्याची पाणी साठवण्याची क्षमता वाढली. गेल्या वर्षी जून, जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याने पहिल्याच पावसात सुमनबाई दडवी यांच्या शेताशेजारी असलेला नाला तुडुंब भरला. त्यानंतर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी कृषी सहायक मनोहर पाटील तसेच इतर अधिकारी सुमनबाई यांच्या शेताजवळ आले. या वेळी सुमनबाई दडवी यांची दारूची भट्टी त्यांना दिसली. कृषी सहायक पाटील यांनी सुमनबाई दडवी यांना हातभट्टीची दारू विक्री बंद करून पुन्हा शेती करण्याचा सल्ला दिला. दारूविक्रीचा व्यवसाय बंद केला नाही तर पोलिसांत तक्रार देण्याचा इशारा दिला. कृषी सहायक पाटील यांचा सल्ला एेकून सुमनबाई दडवी यांनी जून, जुलै महिन्यात शेतात कापूस, ज्वारी, बाजरीची पेरणी केली. नाल्याला चांगले पाणी असल्याने त्यांच्या विहिरीलाही पाणी आले. त्यामुळे सुमनबाई यांनी दारूविक्रीला रामराम ठोकत रब्बी हंगामात शेतात गहू, हरभऱ्याची पेरणी केली. जलयुक्त शिवार अभियानामुळे सुमनबाई दडवी यांची शेती सुजलाम् सुफलाम् झाली. त्याबद्दल मनोहर पाटील यांचा प्रशासनाने सत्कार केला. 
 
चार हजार लोकसंख्येचे गाव 
शहरापासून २२ किलाेमीटर अंतरावरील चौगावची लोकसंख्या चार हजार ६३९ आहे. गावात लागवडी लायक क्षेत्र १७२८.३२ हेक्टर तर वनाखालील क्षेत्र ९३८.१९ हेक्टर आहे. तसेच ८६४ हेक्टर क्षेत्र जिरायत आहे. गावात तीन हजार ५८ पाळीव प्राणी आहेत. 
 
इतरांनाही मिळेल प्रेरणा 
- चौगाव येथील सुमनबाई दडवी यांचे उदाहरण इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून होणाऱ्या कामांना निश्चितच प्रेरणा मिळेल.
-गणेश मिसाळ, प्रांताधिकारी,धुळे 
 
गावात जलयुक्तमधून अनेक कामे 
गावात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून कंपार्टमेंट बंडिंग, मातीनाला बांधाचे खोलीकरण, बळकटीकरण, सिमेंट नालाबांधाचे खोलीकरण, बळकटीकरण, सीसीटी, वनतलाव आदी कामे करण्यात आली. साधारण ३३० हेक्टरवर कंपार्टमेंट बंडिंगची कामे झाली. 
 
आगामी खरिपासाठी केली तयारी 
सुमनबाईदडवी यांच्या कुटुंबात त्यांच्यासह सून, तीन नातवंडे असा परिवार आहे. पूर्वीचा मद्यविक्रीचा व्यवसाय सोडून त्या आज सन्मानाने जीवन जगत अाहेत. गेल्या वर्षी खरीप आणि रब्बी हंगामात चांगले उत्पन्न मिळाल्याने त्यांनी आगामी खरिपाची तयारी सुरू केली आहे. 
जलयुक्त शिवार अभियानातून चौगाव येथील नाल्यातून गाळ काढल्यानंतर नाल्यात झालेला जलसाठा पाहताना सुमनबाई दडवी. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...