आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलसंजीवनी देणाऱ्या ‘अमृत’ योजनेस दिरंगाईची विषबाधा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शहरात ६०० कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी आणि शहराला जलसंजीवनी देणाऱ्या ‘अमृत’ योजनेला पालिकेच्या दिरंगाईची विषबाधा झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या योजनेबाबत सत्ताधारी बोलण्यासही तयार नाहीत, तर दुसरीकडे जिओलॉजिकल सर्वेक्षणही रखडले असल्याने पालिका निवडणुकीत भाजपचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे अाणि आमदार संजय सावकारे यांनी दिलेली आश्वासनेही सत्ताधारी फोल ठरवत असल्याचे वास्तव समोर आले आहे. 
 
शहरातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटावा यासाठी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी शहराचा ‘अमृत’मध्ये समावेश केला होता. पालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपने सर्व जाहीर सभांमधून ‘अमृत’ योजनेचे आश्वासन दिले. यापूर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभाराला कंटाळलेल्या नागरिकांनी भाजपच्या नेत्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून पालिकेत भाजपला एकहाती सत्ता दिली. मात्र, नंतरच्या काळात या योजनेचाही अनेक सत्ताधाऱ्यांना विसर पडला. सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठीही सध्या प्रयत्न होत नसल्याची स्थिती कायम आहे. नगराध्यक्ष रमण भोळे यांनी पदभार घेतल्यानंतर आमदार सावकारेंसोबत एक वेळा तापी नदीपात्राची पाहणी करून जागानिश्चितीचे प्रयत्न केले. यानंतर ‘अमृत’संदर्भात पालिकेतील सत्ताधारी चकार शब्द बोलण्यास तयार नाहीत. मध्यंतरी या योजनेतून होणाऱ्या बंधाऱ्याच्या कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग (नाशिक)च्या महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (मेरी) आदी संस्थांच्या भूगर्भ वैज्ञानिकांकडून जिऑलॉजिकल सर्वेक्षणाचे कामही रखडले. पालिकेने या योजनेसाठी हिश्श्याची रक्कमही मजीप्राकडे वर्ग केली. तरीही योजना का रखडली? याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. 

Ñअमृत’ योजनेचीप्रक्रिया सध्या जलदगतीने सुरू आहे. बंधाऱ्याच्या जागेची पाहणी आणि सर्वेक्षणासाठी एमजीपीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. अल्पावधीत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत. रमणभोळे, नगराध्यक्ष, भुसावळ
 
बंधाऱ्यावर खर्च वाढला 
शहरालापाणी पुरवठा करण्यासाठी तापी नदीपात्रातील रेल्वेची मूळ मालकी असलेला बंधारा सध्या वापरला जातो. या बंधाऱ्याची उंची दरवर्षी उन्हाळ्यात वाढवावी लागते; अन्यथा मे आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात शहरातील पाणीप्रश्न बिकट होताे. गेल्या तीन वर्षांपासून या बंधाऱ्याची उंची वाढविण्याच्या कामावर अंदाजे किमान १५ ते २० लाख रुपयांचा खर्च पालिकेने केला आहे. किमान पुढच्या वर्षापर्यंत ‘अमृत’ योजनेतून कोल्हापूरटाइप बंधारा उभारला गेल्यास शाश्वत साठा करता येईल. 

रस्त्यांच्या कामांना लागला ब्रेक 
महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाने शहरात ‘नगरोत्थान’ महाअभियानातून रस्त्यांच्या कामांसाठी निधी मंजूर केला होता. मात्र, ‘अमृत’ योजनेतून नवीन पाइपलाइन टाकली जाणार असल्याने रस्त्यांचे खोदकाम होऊन निधी वायफळ खर्च होईल, हे कारण पुढे करून ‘नगरोत्थान’ची कामे थांबविण्यात आली. तसेच दुसरीकडे ‘अमृत’ योजनेचे कामही पूर्णत्वाकडे जात नसल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण आणि सिमेंटीकरणाच्या कामांना नाहक ब्रेक लागला असून, त्रास कायम आहे. 

उभारणी होणार कधी? 
‘अमृत’योजनेच्या माध्यमातून कोल्हापूरटाइप बंधाऱ्याची उभारणी केली जाणार आहे. या बंधाऱ्यासाठी जिऑलॉजिकल सर्वेक्षण झाले नाही तर उभारणी कधी होणार? असा प्रश्न आहे. सर्वेक्षण आणि त्यापुढील कामांना पालिका प्रशासन आणि भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी पाठबळ देणे आवश्यक आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...