यावल (जि.जळगाव) - तालुक्यातील अंजाळे येथील ४५ वर्षीय पुरुषाची प्रेमसंबधाच्या संशयामुळे निर्माण झालेल्या वैमनस्यातून हत्या झाल्याचे बुधवारी (दि.१)मध्यरात्री उघडकीस आले. धनराज त्र्यंबक सपकाळे मृताचे नाव असून गुरुवारी यावलमध्ये गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तीन संशयीतांना ताब्यात घेतले आहे. हत्येनंतर या घटनेला अपघात दर्शवण्याचा प्रयत्न झाल्याचेदेखील समोर येत आहे.
अंजाळे येथील विजय त्र्यंबक सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा भाऊ धनराज सपकाळे (वय ४५) हा बुधवारी (दि.२) त्यांच्या अंजाळे शिवारातील शेतात ट्रॅक्टर (क्रमांक एमएच. १९-एए-७०२८)द्वारे शेततळ्याच्या मातीची नांगरटी करत होता. मात्र, धनराज बुधवारी रात्री ११ वाजेपर्यंत घरी परतला नाही. यामुळे धनराजची पत्नी संगीता सपकाळे यांनी विजय सपकाळे यांचे घर गाठून पती धनराज घरी परतले नाहीत. फोनदेखील उचलत नाहीत, असे सांगितले.
यानंतर विजय सपकाळे भावाचा शोध घेण्यासाठी निघाले. रात्री ११.३० वाजेच्या सुमारास भुसावळ रस्त्यावरील मोरनदीच्या पुलाकडून शेताकडे जाताना त्यांना गावातील संशयित पंढरीनाथ तुळशिराम सपकाळे, पप्पू भास्कर सपकाळे व अन्य एक अनोळखी असे तिघे एका दुचाकीवर वेगाने जाताना दिसले. यानंतर पुढे पुलावर कपाळास जखम असलेला धनराज मृतावस्थेत आढळला.
दुचाकीवर गेलेल्या तिघांनी धनराजची हत्या केल्याचा संशय व्यक्त करत विजयने यावल पोलिसात गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी तिन्ही संशयीतांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली. डीवायएसपी अशोक थोरात, पोलिस निरीक्षक बळीराम हिरे यांनीदेखील घटनास्थळी पाहणी केली. सहायक निरीक्षक योगेश तांदळे, हवालदार संजीव चौधरी तपास करीत आहे. गुरूवारी यावल ग्रामीण रूग्णालयात डॉ. कौस्तुभ तळेले यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले.
श्वानपथकाची मदत
घटनास्थळी जळगाव येथून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. ज्या ठिकाणी धनराज सपकाळेचा मृतदेह आढळला, त्या स्थळापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर जेथे धनराज ट्रॅक्टरवर काम करत होता तेथपर्यंत रक्ताचे डाग आणि रक्ताने माखलेला एक कापड श्वानपथकाने हुडकून काढला. ट्रंक्टरवरही रक्ताचे डाग होते.
असा होता वाद
मृत धनराजचे संशयीतांपैकी एकाच्या पत्नीशी प्रेमसंबध असल्याचा संयश होता. या कारणावरून सन २००९ मध्येदेखील मोठा वाद झाला होता. या संशयासह पूर्ववैमनस्यातून धनराजची हत्या झाली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
पुढील स्लाईडवर वाचा सविस्तर बातमी...