आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावलमध्ये स्नेहसंमेलनात हाणामारी: 20 जणांविरुद्ध दंगलीसह अॅट्रॉसीटीचा गुन्हा,चौघे जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल- येथील साने गुरूजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील स्नेहसंमेलनामध्ये गाणे लावण्यावरून मोठा वाद उफाळला. या वेळी झालेल्या हाणामारीत चार जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.याप्रकरणी विद्यार्थ्यांसह २० जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला. मात्र, संशयीतांच्या अटकेसाठी जमावाने पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.

नगरपालिका संचलित साने गुरूजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सोमवारी वार्षिक स्नेहसंमेलन होते. पहिल्या सत्रात मान्यवरांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उद््घाटन झाले. हा कार्यक्रम आटोपल्यावर दुसऱ्या सत्रात दुपारी १२ वाजेनंतर सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. त्यात विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटिका,वैयक्तिक व समूह गीते-नृत्य सादर केले. दुपारी २ वाजेच्या सुमारास शेवटची दोन गाणे शिल्लक असताना एका समूह गिताच्यावेळी गोंधळ उडाला. त्यातच साऊंड सिस्टीम बंद पडल्याने वाद वाढून प्रकरण थेट हाणामारीपर्यंत गेले. त्यात भूषण प्रभाकर तायडे,विकास प्रकाश तायडे यांना किरकोळ मार लागला. तर चेतन दिलीप गजरे या इयत्ता ११ वीच्या विद्यार्थ्यास रॉडने मारहाण झाल्याने त्याचे डोके फुटले. सुवर्ण मिलिंद अडकमोल यासदेखील जबर मारहाण झाली.यावलमध्ये प्राथमिक उपचार करून सुवर्णला जळगाव येथील जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले. याप्रकरणी चेतन गजरेच्या फिर्यादीवरून २० जणांवर अॅट्रॉसिटीसह दंगलीचा गुन्हा दाखल झाला. संशयीतांमध्ये काही विद्यार्थ्यांचादेखील समावेश आहे.
 
अटकेसाठी ठिय्या
दुपारी झालेल्या या वादानंतर तीन वाजेपासून पोलिस ठाण्यासमोर महिला-पुरूषांचा जमाव एकत्र आला. गुन्हा दाखल होताच जमावाने संशयीतांना अटक करण्याच्या मागणीसाठी ठिय्या दिला. सारंगधर अडकमोल, अनिल जंजाळे, अशोक बोरेकर, भिमराव गजरे, विष्णू पारधे,संजय गजरे, प्रकाश पारधे, हितेश गजरे आदींनी जमावाची समजूत काढील. यानंतर रात्री ८ च्या सुमारास जमाव पांगला.
 
तर संस्था चालकांवर गुन्हा
स्नेहसंमेलनात वाद होतील, अशा प्रकारची गाणी व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यावर संस्थाचालकांनी अंकुश लावला पाहिजे. स्नेहसंमेलनाची संपूर्ण जवाबदारी संस्थाचालकांवर असते. यामुळे विनाकारण वाद उद््भवल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर गुन्हे दाखल करू, असे शहरात आलेल्या अपर पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सांगीतले.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...