आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोकर गावात संपूर्ण दारूबंदीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - तालुक्यातील भोकर गावात रात्रंदिवस अवैधरीत्या दारूविक्रीमुळे मोठ्यांसह लहान मुलेही दारूच्या व्यसनाला बळी पडली आहेत. यामुळे गावातील समाजस्वास्थ्य बिघडले असून, अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. गेल्या पाच वर्षांत गावात मद्यप्राशनामुळे २४ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष घालून गावात संपूर्ण दारूबंदी करावी, अशी मागणी करीत भोकर येथील महिलांसह ग्रामस्थांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने केली. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांना निवेदन देण्यात आले. 

निवेदनात म्हटले आहे की, भोकर गावातील कोळीवाड्यात अवैध दारूविक्री करण्यात येत आहे. दारूविक्रेत्यांकडे रात्री-बेरात्री मद्यपी दारू पिण्यासाठी येतात; रात्रीच्या वेळेस गोंधळ घालतात. मद्यपींमुळे गाव अशांत झाले असून, सतत भांडणे हाेत असतात. मद्यपी व्यक्ती स्त्रियांना अश्लील बोलतात, त्यांना मारहाण करतात. तरुण मुलेही दारूच्या व्यसनाला बळी पडत चालली आहेत. त्यामुळे गावातील सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे. 
ग्रामस्थांनी दारूविक्रेत्यांना समज देऊनही ते दारूचा व्यवसाय बंद करण्याच्या मन:स्थितीत नाहीत. आम्ही हप्ते देत असल्याने आमचे कोणीच काही करू शकत नाही, अशी उलट उत्तरे देतात. अवैध दारूविक्रेत्यांवर पोलिस कारवाई करण्यासाठी जरी आले तरी, ते येण्यापूर्वीच मोबाइलद्वारे संबंधितांना सावध करतात. त्यामुळे पोलिसांकडून केवळ कारवाईचा देखावा उभा केला जातो. पोलिसांनी वेळीच गावात संपूर्ण दारूबंदी केल्यास ग्रामस्थ आपल्या पद्धतीने दारूबंदी करतील. त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीला पोलिस जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला आहे. याप्रसंगी सरपंच हरीश पाटील, सचिन पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. निवेदनावर रंजना सोनवणे, रत्नाबाई सोनवणे, सुमनबाई सूर्यवंशी, मीराबाई सोनवणे यांच्यासह २६ महिला ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 
पोलिसांवर हप्तेखोरीचा आरोप 
दरम्यान,गावातील अवैध दारूच्या व्यवसायाबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरही कारवाई होत नाही. पोलिस अवैध दारूविक्रेत्यांकडून हप्ते घेतात, असा आरोप ग्रामस्थांनी या वेळी केला आहे. शुक्रवारी दारूबंदीच्या कारणावरून भोकर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी पकडलेली दारू सोडून दिल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला. 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...