आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका निवडणूक; पक्षांतर्गत बंडखोरी करणाऱ्यांना अभय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - पालिका निवडणुकीनंतर आता सर्वच प्रमुख राजकीय पक्ष आणि आघाड्यांमध्ये जय-पराजयाची कारणे चर्चेत आली आहेत. या निवडणुकीत नामनिर्देशनपत्र भरण्याच्या काळात सर्वच राजकीय पक्षांनी पक्षांतर्गत बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले होते. मात्र, निवडणुकीनंतर शिस्तप्रिय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपसह, राष्ट्रवादी, शिवसेनेने पक्षांतर्गत बंडखोरांना अभय दिले आहे.
पालिका निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, जनआधार, बसपा, काँग्रेस, एमआयएम आदी पक्षांनी उमेदवार रिंगणात उतरवले होते. निवडणुकीत जनआधार आणि एमआयएम हे पक्ष नवीन असल्याने यात बंडखोरीचा प्रश्नच नव्हता. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला संपूर्ण जागेवर उमेदवार उभे करता आले नाहीत. यामुळे या पक्षातही बंडखोरांचे प्रमाण कमी होते. मात्र शिवसेनेतील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केल्याच्या तक्रारी झाल्या आहेत. भाजपच्या प्रभाग एकपासून २४ पर्यंतच्या सर्वच प्रभागांत कमी-अधिक बंडाळी झाली. प्रभाग एकमधून अनुसूचित जाती मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. जतीन मेढे यांच्या पत्नी अपक्ष उमेदवार होत्या. तर प्रभाग सातमधून भाजपच्या गोटातील मुकेश पाटील विशाल जंगले यांनी अपक्ष उमेदवारी करून विजय मिळवला. यासह भाजपसोबत जोडलेले शिशिर जावळे यांनीही अर्ज कायम ठेवल्याने त्यांना ऐनवेळी शिवसेनेने पुरस्कृत केले. शहरातील अन्य प्रभागांतही भाजपचे पदाधिकारी नसले तरी पक्षाचे सक्रिय प्राथमिक सदस्य असणाऱ्यांनी उमेदवार चुकीचा दिल्याचा ठपका ठेवून विरोधी पक्षांचे काम केले. या सर्व बंडखोरांवर भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना बडतर्फे करण्याचा इशारा दिला होता. मात्र, निवडणुकीला दोन आठवडे होऊनही कारवाईचा बार अद्याप फुसकाच आहे.
गुप्तपणे विरोधकांना केली मदत
सर्वच राजकीय पक्षांतील पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांनी काही प्रभागांमध्ये गुप्तपणे अपक्ष आणि विरोधातील उमेदवारांना मदत केल्याची बाब सर्वच समोर आली. अशा कार्यकर्त्यांवर पक्षांतर्गत कारवाई करणे कठीण मानले जाते, मात्र काही प्रभागांत अनपेक्षित पराभव झालेल्या उमेदवारांकडून तक्रारी वाढल्याने नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.
निवडून आला तो आपला ­: उत्तरभागातील एका प्रभागात भाजपचे तिन्ही इच्छुक पालिका निवडणुकीत परस्परांशी भिडले. यावर पक्षाने सुरुवातीला समझोता करण्याचा प्रयत्न केला, मात्र यानंतर तिन्हींमधून निवडून येईल तो आपला, अशी भूमिका ठेवली.

स्वार्थी राजकारण आले शहरवासीयांसमोर
शहरातील राजकारणाला स्वार्थी, व्यक्तीकेंद्रित आणि बोटचेपी राजकारणाची दिशा मिळाली आहे. भाजपने अर्ज भरण्याच्या दोन दिवस आधीच पक्षात प्रवेश केलेल्या १० ते १५ जणांना उमेदवारी दिली. यामुळे पूर्वी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना संधी मिळाली नाही. यामुळे दोन जागांवर भाजपला फटका बसला. हे बेगडी राजकारण आता सर्वसामान्यांनाही लक्षात आले आहे. बोटचेपी धोरणांमुळे राजकारणातील मूलतत्वे बाजूला सारली जात आहेत.
बातम्या आणखी आहेत...