आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ अागारातून सात जादा बसेस साेडल्याने टळली गैरसाेय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- भुसावळ येथील रेल्वे यार्डात नागपूरकडून खंडव्याकडे जाणाऱ्या मालगाडीचे पाच डबे शनिवारी पहाटे ५.१५ वाजता घसरले. परिणामी अप डाऊन मार्गावरील वाहतूक नऊ तास ठप्प झाली हाेती. नागपूरकडे जाणाऱ्या शेकडाे प्रवाशांनी अारक्षित तिकिटे रद्द करून बसने प्रवास करणे पसंत केले. गर्दी वाढल्याने भुसावळ अागाराने तातडीने नियाेजन करून सात जादा बसेस साेडून प्रवाशांना दिलासा दिला.

मालगाडीचे डबे घसरल्याने सकाळी ६.३० वाजता भुसावळातून सुटणारी अमरावती न्यू नरखेड पॅसेंजर रद्द करण्यात अाली. त्यामुळे नागपूरकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. मलकापूर, शेगाव, अकाेला, बडनेराकडे जाण्यासाठी जाेपर्यंत मार्ग सुरळीत हाेत नाही, ताेपर्यंत कुठलाच पर्याय नसल्याने तिकिटे रद्द करावी लागली. नागपूरकडे धावणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांनी प्रवास करणाऱ्या ११२ प्रवाशांनी प्रवासाची अारक्षित तिकिटे दुपारी वाजेपर्यंत रद्द केली. रेल्वे प्रशासनाने त्यांना ४४ हजार १७० रुपयांचा परतावा दिला. जनरल तिकीट रद्द हाेण्याची संख्याही जवळपास ५०० ते ६०० पर्यंत हाेती. ही तिकिटे रद्द करण्यासाठी भुसावळ रेल्वेस्थानकावरील जनरल तिकीट खिडकीवर गर्दी केली हाेती. गाेंधळ हाेऊ नये, म्हणून रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानही लक्ष ठेवून हाेते. प्रशासनाकडून वेळाेवेळी प्रवाशांना मार्गदर्शक सूचना देण्यात अाल्या.

खाद्यपदार्थांची विक्री दुपटीने वाढली
मालगाडीच्या अपघातामुळे नागपूरकडील वाहतूक ठप्प झाल्याने फलाट चार सहावर प्रवाशांनी गर्दी केली. त्यामुळे खाद्यपदार्थ विक्री दुपटीने वाढल्याचा अंदाज विक्रेत्यांनी वर्तवला अाहे. बसस्थानकाच्या अावारातही खाद्यपदार्थ फळविक्रेत्यांची चांदी झाली. प्रवाशांची गैरसाेय हाेऊ नये, म्हणून रेल्वे स्थानकावर सूचना देण्याची व्यवस्था केलेली हाेती.

दीड तासांत उतरवल्या सिमेंटच्या गाेण्या
रुळावरून घसरलेल्या मालगाडीच्या पाच डब्यांतील हजार ९८५ सिमेंटच्या गाेण्या हमालांनी अवघ्या दीड तासांत उतरवून बाजूला ठेवल्या. त्यानंतर क्रेनद्वारे डबे उचलण्यात अाले. अपघातामुळे डॅमेज झालेले रूळ बदलवण्याचे काम दुपारी १.३० वाजता पूर्ण झाले. दुपारी वाजता गीतांजली एक्स्प्रेस नागपूरकडे रवाना झाल्यानंतर प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास साेडला. डीअारएम सुधीरकुमार गुप्ता हे स्वत: पहाटे ५.३० वाजेपासून तळ ठाेकून हाेते.

बस स्थानकाला यात्रेचे स्वरूप
मालगाडीच्या अपघातामुळे नागपूर मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने रेल्वे प्रवाशांनी भुसावळ बसस्थानकाकडे धाव घेतली. अचानक गर्दी वाढल्याने अागारप्रमुख एम.एम. सराेदे यांनी स्वत: पुढाकार घेऊन प्रवाशांची गैरसाेय हाेऊ नये, म्हणून जादा बसेस साेडण्याचे नियाेजन केले. नागपूरकडील मार्गासाठी सात जादा बसेस साेडण्यात अाल्या. त्यात अमरावती, शेगावसाठी प्रत्येकी दाेन अकाेल्यासाठी तीन बसेसचा समावेश हाेता.