आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने काढला 600 महिलांचा विमा, दिली प्रमाणपत्रे; पाककलाही रंगली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - भाजपचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी महिलांसाठी अाजीवन विम्याची याेजना राबवत एका संकल्पनेला मूर्त रूप दिले. यात ६०० महिलांचा अाजीवन विमा काढण्यात अाला. त्याच्या प्रमाणपत्रांचे वितरण गुरुवारी सायंकाळी करण्यात अाले. भाजप महिला माेर्चातर्फे झालेल्या कार्यक्रमात महिलांनी विविध गुणदर्शनातून उपस्थितांची मने जिंकून घेतली. 

भाजप महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली महिलांसाठी विविध कार्यक्रम झाले. या वेळी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा रत्ना बडगुजर उपस्थित हाेत्या. महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी झालेल्या कार्यक्रमात महिलांनी एकाहून एक सरस कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाची सुरुवात पाककलेने झाली.
 
 या वेळी महिलांनी लज्जतदार रेसिपींचे सादरीकरण केले. या स्पर्धेत ४० महिलांनी सहभाग नोंदविला. तसेच उखाणे स्पर्धेत ३५ महिलांचा सहभाग राहिला, तर ‘स्त्री- एक शक्ती’ या विषयावरील स्पर्धेत १५ महिलांनी सहभाग नोंदविला. महिलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली.
 
या स्पर्धेत माँसाहेब जिजाऊ, बहिणाबाई चौधरी, सावित्रीबाई फुले, कल्पना चावला, भारतमाता यांच्यासह स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, पहिल्या आयपीएस अधिकारी किरण बेदी अशा वेगवेगळ्या व्यक्तिरेखा मंचावर अवतरल्या. या स्पर्धेत २० महिलांनी सहभाग नोंदविला.
 
 कार्यक्रमादरम्यान भरतनाट्यम् सादर करण्यात आले. तसेच पाच महिलांच्या ग्रुपने विविध प्रकारचे नृत्य सादर केले. त्याचप्रमाणे विमलादेवी अग्रवाल यांच्या स्मरणार्थ ६०० कष्टकरी महिलांना पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेंतर्गत आजीवन विम्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तसेच भाजपतील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
 
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनुप अग्रवाल, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा रत्ना बडगुजर, वालीबेन मंडोरे, वैभव दुसाने, प्रतिभा चौधरी, वैशाली शिरसाठ, अमृता पाटील, भारती माळी, विद्या देसले, सुलोचना चौधरी, मंगला कवडीवाले, विद्या बडगुजर, निशा चौबे यांनी परिश्रम घेतले. 
बातम्या आणखी आहेत...