आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांना आता 80-20 पॅटर्न, नापास होण्याच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सीबीएसईच्या अभ्यासक्रमात येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून दहावीच्या विद्यार्थ्यांना ८०-२० पॅटर्ननुसार परीक्षा द्यावी लागणार आहे. सध्या नववीत असलेले विद्यार्थी उत्तीर्ण होऊन दहावीत जातील. तेंव्हा फेब्रुवारी २०१८ पासून होणारी दहावीची परीक्षा या नवीन पॅटर्ननुसार होणार आहे. तसे अध्यादेश सीबीएसईने २२ डिसेंबर रोजी दिले आहे. 
 
सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना अाता ८० गुणांचा पेपर सोडवावा लागेल, तर २० गुण शाळेच्या अंतर्गत परीक्षा, प्रात्यक्षिकांसाठी ठेवण्यात आले आहे. यापूर्वी प्रत्येक विषयासाठी शाळेच्या हातात ७० तर बोर्डाकडे केवळ ३० गुणांचे हक्क होते. आता त्यात अमुलाग्र बदल करून बोर्डाने स्वत:कडे ८० गुणांचे हक्क घेतले आहे. या बदलामुळे विद्यार्थी नापास होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. असे असले तरी, शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी हा महत्त्वाचा बदल आहे. त्या अनुशंगानेच बदल करण्यात आला असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

शाळांकडे ७० गुणांचे हक्क असल्यामुळे जास्त गुण मिळवण्याचे प्रकार होत होते. यात बोर्डाने आता हस्तक्षेप केला आहे. आता ८० टक्के गुण पेपर तपासणीवरून मिळणार आहेत. म्हणजेच बेार्डाकडून पेपर तपासणी होऊन विद्यार्थ्याने अभ्यासातून मिळवलेले गुण त्याला मिळतील. पेपर तपासणीसाठी वेगळ्या ठिकाणी जातात, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप होऊ शकत नाही. या पद्धतीमुळे आता विद्यार्थ्यांना अभ्यासावर भर द्यावा लागणार आहे. शाळेत होणारे उपक्रम, प्रात्यक्षिकांना केवळ २० गुणांची मर्यादा असणार आहे. दहावी पास होण्यासाठी प्रत्येक विषयात किमान ३५ गुण मिळवणे अनिवार्य आहे. यात २० गुण शाळांच्या अधिकारात आहेत. तर उर्वरित ८० गुणांचा पेपर सोडवावा लागणार आहे. हा पेपर सीबीएसईकडून तपासला जाईल. सीबीएसईच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा अधिक कस लागणार आहे. तसेच त्यांना आपल्या अभ्यासाचे नियोजन वाढवावे लागेल. 

विद्यार्थ्यांना अधिक अभ्यास करावा लागणार 
- ८०-२० पॅटर्नमुळे विद्यार्थ्यांना आता अधिक अभ्यास करावा लागणार आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सीबीएसई सातत्याने चांगले बदल करीत आहेत. त्यापैकी हा एक बदल आहे. सुषमाकंची, प्राचार्य, ओरियन सीबीएसई स्कूल 
बातम्या आणखी आहेत...