आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे: सुरक्षेसाठी व्यापाऱ्यांनीच बसवले सीसीटीव्ही कॅमेरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील रणसिंग चौकात नेहमी वर्दळ असते. त्यामुळे या चौकात दक्षतेचा उपाय म्हणून पारोळा रोड व्यापारी संघटनेतर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. लवकरच गल्ली क्रमांक दोनमधील लालबाग मारुती मंदिराजवळही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. 
 
शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावर मुख्य बाजारपेठ आहे. या रस्त्यावर सराफ बाजार असून, कपड्यांसह विविध प्रकारची लहानमोठी दुकाने आहेत. या ठिकाणी सकाळी आठ ते रात्री दहा या वेळेत मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी छोट्या मोठ्या चोऱ्या होतात. काही वेळा दुचाकी लांबवल्या जातात. सोनसाखळी लांबवण्याचे प्रकारही यापूर्वी घडले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना होती. त्यातच या रस्त्यावरील सर्वात महत्त्वाच्या असणाऱ्या रणसिंग चौकात नेहमी लहानमोठे अपघात होतात. गेल्या महिन्यात चौकात असलेल्या वीज कंपनीच्या डीपीवर ट्रक आदळला होता. या ठिकाणी एका विद्यार्थ्याचाही अपघातात मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर दक्षतेचा उपाय म्हणून रणसिंग चौकात पारोळा रोड व्यापारी संघटनेने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. एक कॅमेरा या चौकात असलेल्या सिग्नलवर तर दुसरा रेलन दुकानाजवळ बसवण्यात आला आहे. दोन्ही कॅमेऱ्यांच्या कक्षेत दाेन नंबर चौक, पाचवी गल्लीपर्यंतच्या चौकाचा भाग येतो. त्यामुळे या चौकासह परिसरात चोरीची घटना किंवा दुसरी कोणतीही दुर्घटना घडल्यास पोलिसांना या कॅमेऱ्यांची चांगली मदत होणार आहे. 
 
आगामी काळात गल्ली नंबर दोनमधील लालबाग चौकात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचे नियोजन संघटनेने केले आहे. 
 
विधायक उपक्रम 
पारोळा रोड व्यापारी संघटनेतर्फे आगामी काळात विविध विधायक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यापूर्वी शहरातील इंदिरा गार्डनजवळील चौकात वंदेमातरम् प्रतिष्ठानतर्फेही स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या कॅमेऱ्यांमुळे या चौकातील सुरक्षा मजबूत झाली आहे. कॅमेऱ्यामुळे या परिसरात सोनसाखळी लांबवण्याचे प्रकार कमी झाले आहेत. 
 
स्वच्छतागृहाचा प्रस्ताव 
- पारोळा रोड व्यापारी संघटनेतर्फे आगामी काळात विविध सुविधा देण्यात येणार आहेत. आग्रा रोड, पारोळा रोडवर महिलांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा नाही. या पार्श्वभूमीवर व्यापारी संघटनेतर्फे या भागात महिलांसाठी स्वच्छतागृह बांधून दिले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेकडे जागेची मागणी करण्यात आली आहे. -गोपालमाने, अध्यक्ष, व्यापारी संघटना 
 
बातम्या आणखी आहेत...